उपराष्ट्रपती पद सोडलं, पण हक्काचं घर मिळेना; जगदीप धनखड अजूनही ‘वेटिंग’वर; मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

देशाचे उपराष्ट्रपती पद भूषवलेले जगदीप धनखड यांनी पदत्याग करून आता पाच महिने उलटले आहेत, मात्र अद्याप त्यांना सरकारी निवासस्थान मिळालेले नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी 21 जुलै रोजी (संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यास पाच महिन्यांचा काळ उलटला असला तरी अद्याप त्यांना सरकारी निवासस्थान मिळालेले नाही. धनखड यांना मोदी सरकारकडून ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याचे चित्र आहे.

सप्टेंबर महिन्यात जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान रिकामे केले. सध्या ते दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर भागातील ‘गदईपूर’ येथील एका खाजगी फार्महाऊसमध्ये राहत आहेत. विशेष म्हणजे, हे फार्महाऊस ‘आयएनएलडी’चे नेते अभय चौटाला यांचे आहे. देशाच्या माजी उपराष्ट्रपतींना एका दुसऱ्या नेत्याच्या फार्महाऊसवर आश्रय घ्यावा लागत असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 ऑगस्ट रोजी धनखड यांनी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांशी पत्रव्यवहार केला होता. माजी उपराष्ट्रपती या नात्याने त्यांना मिळणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची त्यांनी मागणी केली होती. मात्र अद्यापही ते वेटिंगवर आहेत. दोन महिने उलटूनही अद्याप त्यांना निवासस्थान उपलब्ध करून दिले जात नाही, अशी खंत त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे.

माजी राष्ट्रपतींना काय मिळते?

– निवृत्तीनंतर माजी राष्ट्रपतींना टाई-8 दर्जाचा बंगला मिळतो.
– सुमारे 2 लाख रुपये पेन्शनही मिळते.
– खासगी सचिव, अतिरिक्त खासगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक आणि 4 परिचर मिळतात.
– एक डॉक्टर आणि एक नर्सिंग ऑफिसर.