
शीतगृहात तस्करी मार्गाने बेदाण्याची साठवणूक झाली आहे. त्यामुळे सांगली, तासगावसह पंढरपूर, सोलापूर येथील बेदाणा शीतगृहे सील करून प्रशासनाने त्याची तपासणी करावी. जे दोषी सापडतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष दत्ताजी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
सांगली, तासगावमध्ये तस्करी मार्गाने चीनचा बेदाणा आला आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला. यावेळी द्राक्ष संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांच्यासह संचालक उपस्थित होते.
व्यापारी गेल्या चार महिन्यांपासून तस्करी मार्गाने बेदाणा आणत आहे. त्यामुळे ज्या व्यापाऱ्यांनी अशा पद्धतीने बेदाणा आणला आहे, त्यांच्या बँकेची खाती, मालमत्ता याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करून पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासनाने बाजार समिती, द्राक्ष संघ, बेदाणा उत्पादक शेतकरी, व्यापारी यांची एकत्रित समिती गठित करावी. या समितीच्या माध्यमातून बेदाणा शीतगृहातील बेदाण्याची तपासणी करावी. ही तपासणी झाल्यानंतर शीतगृहे सील करावीत, म्हणजे शीतृगहातील बेदाणा कुठेही बाहेर पडणार नाही. तसेच किती बेदाणा शिल्लक आहे, हे समोर येईल.
पाटील म्हणाले, आम्ही याची माहिती प्रशासनाला दिली होती. प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तरच चोरीला आळा बसेल. शीतगृहात येणाऱ्या बेदाण्यावर बाजार समितीचे नियंत्रण हवे. येणाऱ्या बेदाण्याचे रेकॉर्ड होईल. शासनाने बेदाणा शीतगृहाचे जिओ टॅगिंक करावे. शीतगृहावरील सीसीटीव्ही फुटेज ही तपासले पाहिजेत. येणाऱ्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर चीनचा बेदाणा तस्करी मार्गाने आणून दर पाडण्याचा घाट घालणाऱ्या व्यापाऱ्यांवर आळा घातला नाही, तर तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.


























































