
कुटुंबासोबत, मित्रांसोबत किंवा देव दर्शनाने नववर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी एकीकडे नागरिकांची लगबग पाहायला मिळाली. दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यामध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नालागड पोलीस ठाण्याच्या बाजूला जोरदार स्फोट झाला. या स्फोटाची तिव्रता इतकी भीषण होती की, आजूबाजूच्या परिसरातील अनेक किलोमीटर अंतरावरील इमारतींच्या काचा फुटल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
सैनिक भवन, पोलीस स्थानक आणि बाजारसमिती कार्यालयाजवळच्या सर्व इमारतींना या स्फोटाचा दणका पहाटे पहाटे बसला. घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांसह पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासाला सुरुवात झाली असून स्फोट झालेला सर्व परिसर बंद करण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीम सध्या घटनास्थाळावर तपासणी करत आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, याची अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. नालागडचे आमदार हरदीप सिंग बावा यांनी सुद्ध स्फोट झाल्याची पुष्टी केली आहे. या प्रकरणी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य समोर येईल, असं ते म्हणाले आहेत.

























































