एअर मार्शल नागेश कपूर यांनी वायुसेना उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला

हिंदुस्थानी वायुसेनेच्या उपप्रमुखपदी (व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ) एअर मार्शल नागेश कपूर यांनी आज कार्यभार स्वीकारला. ते निवृत्त होणाऱ्या एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांची जागा घेत आहेत. एअर मार्शल नागेश कपूर हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (एनडीए) पदवीधर आहेत. डिसेंबर १९८५ मध्ये एनडीए प्रशिक्षण पूर्ण करून ६ डिसेंबर १९८६ रोजी ते वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये कमिशन्ड झाले. ते कुशल फायटर पायलट, क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आणि फायटर कॉम्बॅट लीडर आहेत. मिग-२१ आणि मिग-२९ च्या सर्व व्हेरिएंट्सवर त्यांनी उड्डाण केले आहे. त्यांचा ३,४०० तासांपेक्षा अधिक ऑपरेशनल आणि प्रशिक्षणात्मक उड्डाणांचा अनुभव आहे.

गेल्या ३९ वर्षांहून अधिक सेवेच्या कारकिर्दीत त्यांनी कमांड, ऑपरेशन्स, प्रशिक्षण आणि स्टाफ भूमिकांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ते पाकिस्तानमध्ये डिफेन्स अटॅची म्हणूनही कार्यरत होते. वायुसेना अकादमीत चीफ इन्स्ट्रक्टर (फ्लाइंग) म्हणून त्यांनी पीसी-७ एमके II विमानांच्या इंडक्शनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.