आमदार, खासदारांच्या भाऊ, पुतण्या, मुलांना तिकिटांचे वाटप; भिवंडीत भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते सतरंज्या उचलणार

भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार तसेच खासदारांच्या भाऊ, पुतण्या व मुलांना तिकिटे देण्यात आली आहेत. त्यामुळे भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर आता सतरंज्या उचलण्याची वेळ येणार आहे. नेत्यांच्या मुला-बाळांनाच तिकिटे द्यायची असतील तर आम्ही काय करायचे, असा सवाल निष्ठावंतांनी केला आहे.

भाजपचे आमदार महेश चौघुले यांनी त्यांचा मुलगा मित चौघुले याला प्रभाग १ मधून भाजपतर्फे उमेदवारी जाहीर केली आहे. तर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील यांनी प्रभाग १७ मधून अर्ज दाखल केला आहे. शिंदे गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचा भाऊ माजी नगरसेवक संजय म्हात्रे यांनी प्रभाग १३ मधून अर्ज दाखल केला आहे.

आमदार, खासदारांसह शहरातील माजी नगरसेवकांनीदेखील आपल्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मागून घेतली आहे. माजी उपमहापौर मनोज काटेकर व त्यांच्या पत्नी प्रभाग २१ मधून निवडणूक लढत आहेत. तर शिंदे गटाचे बाळाराम चौधरी यांनी प्रभाग १३ मधून तर त्यांचा मुलगा रोहित चौधरी यांनी प्रभाग १५ मधून उमेदवारी मिळवली आहे.

मदनबुवा नाईक यांचा पत्ता कट

एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले माजी नगराध्यक्ष मदनबुवा नाईक यांच्यासह त्यांच्या पत्नी माजी ज्येष्ठ नगरसेविका गुलाब मदन नाईक व सून अस्मिता प्रभुदास नाईक असे एकाच कुटुंबातील तिघेजण नगरसेवक होते. पण यावेळी गुलाब नाईक यांना उमेदवारी देत मदनबुवा व त्यांची सून अस्मिता यांना उमेदवारी नाकारली आहे. मदनबुवा हे मागील ४० वर्षांपासून पालिका सभागृहात आहेत. परंतु यावेळी त्यांना उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.