नवी मुंबईत 117 उमेदवारी अर्ज बाद; शिंदे गटाचे तीन, भाजपचा एक उमेदवार रिंगणातून बाहेर

नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ९५६ उमेदवारी अर्जापैकी तब्बल ११७उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. त्यामध्ये शिंदे गटाच्या तीन तर भाजपच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. अर्ज बाद झाल्यामुळे हे सर्वच उमदेवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत. अपात्र ठरलेले उमेदवार वकील, माजी नगरसेवक आणि डॉक्टर असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

नवी मुंबईमध्ये २८ प्रभागांमधील १११ जागांसाठी ९५६ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी सर्व उमेदवारांना बोलावून प्रभागनिहाय कागदपत्रांची छाननी केली. यात शिंदे गटाचे प्रज्ञा साष्टे, माजी नगरसेवक रामदास पवळे यांच्यासह बेलापूर सीबीडीतील प्रभाग क्रमांक २७ च्या उमेदवार डॉ. प्रियंका फोंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. पवळे यांच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदकांच्या स्वाक्षरी नव्हत्या. पवळे हे माजी नगरसेवक आहेत तरी त्यांच्याकडून ही चूक झाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपचे प्रभाग क्रमांक १७ मधील उमेदवार अॅड. नीलेश भोजणे यांचा उमेदवारी अर्जही छाननीमध्ये बाद झाला आहे. भाजणे स्वतः वकील आहेत, तरी त्यांचा अर्ज बाद झाल्यामुळे अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध सुरू आहेत. त्यामुळे शिंदे गटाने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवलेली असतानाच तीन उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे.

विक्रीच्या तुलनेत फक्त एक तृतीयांश अर्ज दाखल

नवी मुंबईतील २८ प्रभागांसाठी गेल्या आठवड्यात सुमारे २ हजार ७०० उमेवारी अर्जाची विक्री झाली होती. जागावाटपाचा तिढा लवकर न सुटला गेल्यामुळे पहिले सहा दिवस फारच कमी अर्ज दाखल झाले. शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर उमेदवारी अर्जाचा अक्षरशः पाऊस पडला. अर्ज विक्रीच्या तुलनेत फक्त एक तृतीयांश म्हणजेच ९५६ अर्ज दाखल झाले.