उमेदवारांचा प्रचार करताना दिसाल तर याद राखा! नवी मुंबई पालिका आयुक्तांची कर्मचाऱ्यांना तंबी

नवी मुंबई महापालिकेत काम करत असलेल्या कायम, ठोक मानधनावरील आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करू नये. जर असे घडले तर तो आचारसंहितेचा भंग होणार आहे. जर कोणी कर्मचारी कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करताना आढळून आला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे, अशी तंबी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे.

यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी राजकीय पक्षांकडून महापालिका कर्मचाऱ्यांचा निवडणुकीच्या प्रचारात वापर केला जायचा. मात्र आता या प्रकाराला पालिका आयुक्तांनी पायबंद लावला आहे. महापालिकेच्या सेवेत असलेले कायम तत्त्वावरील अधिकारी आणि कर्मचारी, ठोक मानधनावरील कर्मचारी, ठेकेदारांकडे काम करणारे कर्मचारी, महापालिका शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मानधन व तासिका तत्त्वावरील शिक्षक, बालवाडी शिक्षिका आदींना कोणत्याही उमेदवारांचा प्रचार करता येणार नाही. या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही उमेदवारांच्या रॅलीत सहभागी होऊ नये, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडियातून उमेदवाराचा प्रचार करू नये, महापालिकेच्या धोरणाविरुद्ध बोलण्याचे टाळावे, उमेदवारांचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्याचे काम करू नये, प्रचार साहित्यांचे वाटप करू नये असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. जर कोणी या प्रकारचे काम करताना आढळून आला तर संबंधितांवर गुन्हा दाखल होणार आहे.