
नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या प्रभागात संघाच्याच एका 25 वर्षीय स्वयंसेवकाने भाजपला आव्हान दिले आहे. निनाद दीक्षित असे त्याचे नाव आहे. त्याच्या उमेदवारीमुळे भाजपची मोठी नाचक्की झाली आहे.
संघाचे मुख्यालय असलेला प्रभाग क्रमांक 22 हा अतिशय संवेदनशील परिसर आहे. भाजपच्या नगरसेवकांनी आतापर्यंत बरीच निष्क्रियता दाखवली. महत्त्वाच्या विकासकामांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप निनाद दीक्षितने केला आहे. त्याने नागरिक समितीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या चिन्हावर तो महापालिकेच्या आखाड्यात उतरला आहे.
काय म्हणणे आहे निनाद दीक्षितचे?
लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न, सार्वजनिक सुविधा, पायाभूत कामांकडे यापूर्वीच्या भाजप नगरसेवकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले, असे निनाद याचे म्हणणे आहे. मात्र माझी उमेदवारी बंडखोरी नसून मी भाजपचा प्राथमिक सदस्य नाही. मी भाजपकडे उमेदवारीही मागितलेली नाही. त्यामुळे माझी उमेदवारी बंडखोरी नसून हा निष्क्रियतेविरुद्ध उठाव आहे, असे निनाद दीक्षितने स्पष्ट केले.




























































