
देशाच्या काही भागांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून त्याची लक्षणे दिसत असल्यास वैद्यकीय सल्ला घेण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. आरोग्य विभागही या बाबतीत अॅलर्ट झाला आहे. केरळमधील अलाप्पुझा आणि कोट्टायम जिल्ह्यांत बर्ड फ्लूचा (Avian Influenza) प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर आता शेजारील राज्यांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडू सरकारने केरळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये देखरेख वाढवली असून, केरळमधून येणारी कोंबड्यांची वाहतूक, अंडी आणि पोल्ट्री उत्पादनांवर तात्पुरती बंदी घातली आहे.
नामक्कलमध्ये हाय-अलर्ट
हिंदुस्थानातील अंडी उत्पादनाचे प्रमुख केंद्र असलेल्या तमिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यामध्ये विशेष जैव-सुरक्षा उपाययोजना राबवल्या जात आहेत. येथे दररोज लाखो अंड्यांचे उत्पादन होते, त्यामुळे हा आजार पसरू नये म्हणून पोल्ट्री फार्म्समध्ये कडक पाळत ठेवली जात आहे.
बर्ड फ्लू म्हणजे नक्की काय?
बर्ड फ्लू हा इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे. हा प्रामुख्याने पक्षी आणि प्राण्यांमध्ये पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, २००३ ते ऑगस्ट २०२५ या काळात २५ देशांमध्ये मानवी संसर्गाची ९९० प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये मृत्यूदर ४८% इतका उच्च राहिला आहे.
माणसांना संसर्ग कसा होतो?
हा विषाणू बाधित पक्ष्यांच्या लाळ, विष्ठा किंवा श्वासोच्छवासाच्या थेंबांद्वारे मानवांमध्ये पसरू शकतो. तथापि, योग्यरित्या शिजवलेले चिकन किंवा अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लू होत नाही, कारण उच्च तापमानाला हा विषाणू नष्ट होतो.
बर्ड फ्लूची प्रमुख लक्षणे:
डोळे येणे (Conjunctivitis)
तीव्र ताप आणि थकवा
खोकला आणि घसा खवखवणे
स्नायू दुखणे
मळमळ आणि उलट्या होणे
जुलाब
श्वास घेण्यास त्रास होणे
प्रतिबंधात्मक उपाय (Tips for Prevention):
१. पक्ष्यांच्या संपर्कात येणे टाळा: आजारी किंवा मृत पक्ष्यांपासून लांब राहा. पक्ष्यांच्या असामान्य मृत्यूची माहिती तातडीने प्रशासनाला द्या.
२. अन्न नीट शिजवून खा: चिकन, अंडी किंवा मांस किमान ७५ अंश सेल्सिअस तापमानावर नीट शिजवूनच खा. कच्चे दूध पिणे टाळा, नेहमी पाश्चराइज्ड दुधाचा वापर करा.
0३. हात स्वच्छ धुवा: पक्षी, कच्च्या मांसाला किंवा बाहेरील वस्तूंना स्पर्श केल्यानंतर हात किमान २० सेकंद साबणाने स्वच्छ धुवा.
४. संरक्षणात्मक साधनांचा वापर: जर तुम्हाला पक्ष्यांच्या संपर्कात जावे लागत असेल, तर मास्क, हातमोजे आणि डोळ्यांच्या चष्म्याचा (PPE) वापर करा.
५. लसीकरण: दरवर्षी फ्लूची लस घेतल्याने दुहेरी संसर्गाचा धोका कमी होतो. स्थानिक आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करा.




























































