
महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकवणाऱया उमेदवारांच्या माघारीवरून राज्यात हायव्होल्टेज ड्रामा दिसून आला. कुठे समजूत, कुठे दबाव, तर कुठे राजकीय तोडगे वापरत बंडखोरांच्या मनधरणीसाठी सर्वच पक्षातील नेत्यांनी ‘मिशन थंडखोरी’ मोहीम राबवली. पण बंडखोरांच्या समर्थकांमुळे माघारीवरून घमासानाचे प्रसंगही ओढवले. नाशिक आणि नागपुरात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बंडखोराला घरातच कोंडून ठेवल्याने भाजप नेत्यांना फार मोठी कसरत करावी लागली. सोलापूरमध्ये दोन गटांत तुफान राडा झाला. भाजपच्या माजी नगरसेवकाचे संपर्क कार्यालय तोडण्यात आले.
महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या नाराज झालेल्या इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकावल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली होती. बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. काही अपक्षांनी लागलीच प्रतिसाद देत अर्ज मागे घेतले. तर काही प्रभावशील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱयांची समजूत काढताना नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांना आयारामांविरोधातील भाजपच्या निष्ठावंतांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागले. नागपूरमध्ये माजी मंत्री आमदार परिणय फुके यांनी भाजप बंडखोराची समर्थकांच्या तावडीतून सुटका करत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी घराबाहेर काढले. राज्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी थोपविताना अपक्ष उमेदवारांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
नागपूरमध्ये तीन तासांनंतर बंडखोराची सुटका
नागपूर महापालिकेत भाजपचे पदाधिकारी किसन गावंडे यांनी बंडखोरी करत अर्ज भरला. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न भाजपकडून करण्यात आले, मात्र गावंडे यांनी अर्ज मागे घेऊ नये म्हणून आता समर्थकांनीच त्यांना घरात कोंडले. पाया पडतो, मला अर्ज मागे घेण्यासाठी जाऊ द्या, अशी विनवणी गावंडे यांनी समर्थकांना केली, मात्र समर्थकांनी भाजपवर टीका करत त्यांना तब्बल तीन तास घरात कोंडून ठेवले. गावंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला घरात कोंडले आणि कुलूप लावले. अर्ज मागे घ्यायचा नाही, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली. यामुळे एकच गोंधळ उडाला. नंतर पक्षाचे नेते परिणय फुके हे त्यांच्या घरी आले. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत प्रभाग 13 ड मधून बंडखोरी करणाऱ्या किसन गावंडे यांची सुटका केली.
गावंडेंचे समर्थक कशामुळे नाराज झाले?
प्रभाग 13 ड मधून किसन गावंडे हे भाजपचे संभाव्य उमेदवार होते. किसन गावंडे आणि विजय होले यांच्या नावे एबी फॉर्म दिले होते. शेवटच्या क्षणी पक्षाने किसन गावंडे यांना अर्ज मागे घ्यायला सांगितला. त्यामुळे कार्यकर्ते भडकले. आज आम्ही त्यांना घराबाहेर पडू देणार नाही. मग आधीच पक्षाने एबी फॉर्म का दिला? असा प्रश्न विचारत कार्यकर्त्यांनी कुलूप लावले होते.
नाशिक सिडको परिसरात माघारीवरून राडा
सिडकोत प्रभाग 31 मध्ये उमेदवार व माघार घेणाऱयांमध्ये राडा झाला. पंचवटीत माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पुत्राविरुद्ध माजी नगरसेवकाने बंड केले आहे. प्रभाग 29 मधून दीपक बडगुजरविरोधात अर्ज बाद झालेल्या मुकेश शहाणेंनी महाजनांच्या भेटीनंतरही आपले आव्हान कायम ठेवले आहे. काही ठिकाणी उमेदवार पुरस्कृत करण्याची वेळ पक्षावर आली आहे.
मंत्री गिरीश महाजन व पदाधिकाऱयांना बंडोबांची मनधरणी करण्यात यश आलेच नाही. एबी फॉर्मच्या पळवापळवीचे पडसाद आजही उमटले. पक्षाच्या दबावामुळे सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा व मुलगा दीपक यांना प्रभाग क्रमांक 25 मधून माघार घ्यावी लागली. येथे अनुक्रमे भाग्यश्री ढोमसे ‘क’मधून, तर प्रकाश अमृतकर ‘ड’मधून भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. दीपक बडगुजरने प्रभाग 29 मधून उमेदवारी कायम ठेवली आहे. या प्रभागात दीपक बडगुजरला पक्षाचेच अर्ज बाद झालेले माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचे आव्हान राहील.
सिडकोत जोरदार राडा
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेले देवानंद बिरारी, पत्नी माजी नगरसेविका वंदना बिरारी तसेच बाळकृष्ण शिरसाट हे प्रभाग 31 मधून इच्छुक होते. पण भाजपने शिरसाट यांना उमेदवारी दिली. माघार घेण्यासाठी बिरारी दाम्पत्य आज दुपारी सिडको विभागीय कार्यालयात आले. समोरासमोर येताच त्यांच्यात बाचाबाची झाली.
माजी आमदाराच्या पुत्राविरुद्ध बंड
पंचवटीतील प्रभाग 3 (क) मधून भाजपने माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा मुलगा माजी नगरसेवक मच्छिंद्र सानपला उमेदवारी दिली. यामुळे नाराज माजी नगरसेवक रुची कुंभारकर अपक्ष रिंगणात उतरले. पक्षाच्या मनधरणीनंतर ते माघारीसाठी रवाना झाले, मात्र समर्थकांनी गोंधळ घालून त्यांना माघारीपासून रोखले.
अपक्षाला समर्थकांनी कोंडले
मखमलाबादच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपने ज्ञानेश्वर काकड यांना डावलून बाळू काकड यांना उमेदवारी दिली. अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या ज्ञानेश्वर काकड यांनी माघार घेऊ नये, अन्याय करणाऱ्या पक्षाला धडा शिकवावा म्हणून समर्थकांनी ज्ञानेश्वर यांना घरात कोंडून ठेवले. यामुळे भाजपमधील ही बंडखोरीदेखील दिवसभर चर्चेचा विषय ठरली.
बडगुजर ऊर्फ सलीम कुत्ताने माझा बळी घेतला- शहाणे
माझा बळी सुधाकर भिका बडगुजर ऊर्फ सलीम कुत्ता याने घेतला, असा आरोप प्रभाग 29मधून अर्ज बाद झालेले भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. बडगुजर यांनी चोरलेला तो एबी फॉर्म कोरा होता, सर्वसामान्य कुटुंबातील मला संपवण्यासाठीच त्यांनी माझ्या गटातून मुलगा दीपक बडगुजर याचा फॉर्म भरला. ‘तू भूषण राणेसोबत फिरत असल्यानेच मुद्दाम तुझ्याविरुद्ध फॉर्म भरल्याचे विधान कालच्या भेटीत त्यांनी केले’, असे मुकेश शहाणे म्हणाले. मी याप्रश्नी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी बडगुजर ऐकत नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून कडक शब्दांत मुकेश शहाणे प्रभाग 29 मधून लढणार असे सांगितले होते, असा गौप्यस्फोट केला. बॉम्बस्फोटातील आरोपी, सलीम कुत्ता या देशद्रोह्यासोबत डान्स पाटर्य़ा करणाऱ्यांची विकृती जनतेने लक्षात घ्यावी. बडगुजर यांच्यामुळे प्रभाग 25 मधील 15 ते 20 मुले जेलमध्ये असून त्यांचे घर बरबाद झाले आहे. त्यांनी स्वतःच्या मुलाला वाचवले, त्यांच्यामुळेच अंकुश शेवाळेला आठ-नऊ महिने जेलमध्ये राहावे लागले, असा आरोप केला.
संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज थेट साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून सतत फोनवर बोलताना दिसले. त्यानंतर याबाबत त्यांनीच माहिती दिली. अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. या वेळी इतकी बंडखोरी झाली आहे की त्यांची मनधरणी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विनंती करण्यासाठी मला फोनवर बोलावे लागले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.





























































