
प्रभाग क्रमांक 4 मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सावित्री हिरालाल वाणी यांना तांत्रिक कारणावरून अपक्ष उमेदवार जाहीर करण्याच्या निर्णयावर निवडणूक आयोगाचे थोबाड फुटले. उच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने सपशेल गुडघ्यावर येत सावित्री वाणी यांना शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्याची तसेच मशाल चिन्ह देण्याची हमी दिली.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक चारमधून सावित्री हिरालाल वाणी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला. अर्जासोबत त्यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्मही जोडला होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी सावित्री वाणी यांनी आपल्या अर्जात पक्षाचे चिन्ह नमूद करण्याऐवजी पक्षाचे नाव लिहिल्याचे तांत्रिक कारण पुढे करून त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून घोषित केले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या अजब निर्णयास सावित्री वाणी यांनी अॅड. देवदत्त पालोदकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात आव्हान दिले आणि आपल्याला शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करून मशाल है चिन्ह देण्यात यावे, अशी विनंती केली. न्या. रवींद्र घुगे यांच्या एकल खंडपीठासमोर ही याचिका तातडीने सुनावणीला घेण्यात आली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने अॅड. सचिंद्र शेटे आणि निवडणूक आयोगाचे सहसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी उमेदवाराच्या अर्जाला पक्षाचा वैध एबी फॉर्म जोडलेला आहे, त्यामुळे त्यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार समजण्यात येईल, तसेच मशाल हे चिन्हही बहाल करण्यात येईल अशी हमी दिली. उच्च न्यायालयासमोर निवडणूक आयोगाने एक प्रकारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने चुकीचा निर्णय घेतल्याचेच मान्य केले.
उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. रवींद्र घुगे यांनी आयोगाचे म्हणणे मान्य करत याचिका निकाली काढली. अॅड. देवदत्त पालोदकर यांना अॅड. शुभम खोचे, अॅड. निखिल अडकिने यांनी मदत केली तर महापालिकेतर्फे अॅड. सुहास उरगुंडे यांनी काम पाहिले. सावित्री वाणी यांना ही कायदेशीर लढाई लढण्यासाठी शिवसेनेचे राज्य संघटक चेतन कांबळे तसेच उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह यांनी मदत केली.





























































