‘दशावतार’ऑस्करच्या स्पर्धेत

कोकणच्या लाल मातीतील ‘दशावतार’ आता ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आहे. ऑस्कर अर्थात अॅकॅडमी अवॉर्डस्च्या मुख्य स्पर्धेसाठी जगभरातील हजारो आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून दीडशेहून अधिक चित्रपटांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये ‘दशावतार’ हा एकमेव मराठी चित्रपट आहे. विशेष म्हणजे, अॅकॅडमीच्या स्क्रीनिंग रूममध्ये दाखवला जाणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.

‘दशावतार’ चित्रपटाची ऑस्करवारी निश्चित झाल्याचा अधिकृत मेल प्राप्त होताच दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. पोस्टमध्ये सुबोधने म्हटलेय, आज ‘दशावतार’ ऑस्करच्या मुख्य स्पर्धेत (मेन ओपन फिल्म कॅटेगरी) निवडला गेल्याचा मेल आला आणि गेली अनेक वर्षे आम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्याची दखल घेतली गेल्याचे समाधान मिळाले. हे समाधान फक्त ‘दशावतार’ निवडला गेलाय म्हणून नाहीये, तर आपला मराठी चित्रपट जागतिक स्तरावर तोडीस तोड उभा राहू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय म्हणून आहे. मुख्य स्पर्धेच्या पॅटेगरीत निवडला गेलेला ‘दशावतार’ हा बहुधा पहिलाच मराठी चित्रपट आहे. पुढे सुबोधने म्हटलंय, जिंकणं हरणं नंतरची गोष्ट, पण मुख्य जागतिक प्रवाहात मराठी चित्रपटाची दखल घेतली जाणे हे प्रचंड अभिमानास्पद आहे! ही फक्त सुरवात आहे, आम्ही सातत्याने चांगले काहितरी तयार करण्याचा आणि ते जगासमोर आणून मराठीची मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू! प्रेम आणि
आशीर्वाद असू द्या!.

‘दशावतार’ या चित्रपटात कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री आणि त्याच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. बाबुली मेस्त्राr ही मुख्य भूमिका ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 28 कोटींची दणदणीत कमाई केली.