
साताऱ्यात सुरू असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले आणि धमकावत प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न शनिवारी संमेलनस्थळीच झाल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व कार्याध्यक्ष कुलकर्णी यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
संमेलनाच्या आजच्या तिसऱया दिवशी प्रकाशन मंच या दालनात पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आटोपून बाहेर पडत असतानाच दुपारी एकच्या सुमारास अचानकपणे हल्लेखोराने ‘तू संमेलन घेतोच कसे’ अशी दमदाटीची भाषा वापरत जिवे मारण्याची धमकी देत विनोद कुलकर्णी यांच्यावर झडप घातली. त्यांच्या तोंडाला काळे फासले. त्यानंतर त्याने लगेच राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. या घटनेत विनोद कुलकर्णी यांच्या डोळ्यात रसायन गेल्यामुळे इजा पोहोचली.
कुलकर्णी हे मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्षही आहेत. काळे फासणाऱ्या प्रज्ञासूर्य सामाजिक संस्थेचा अध्यक्ष संदीप जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.





























































