
चार-पाच दिवसांपूर्वी भाजपचं डोंबिवलीचं घुबड आलं होतं. ते म्हणत होतं छत्रपती संभाजीनगर नामकरण आम्ही केलं आणि पहिला महापौर आमचा होणार. तुम्ही स्वप्नं बघा, तुमचा महापौर होणार नाही. महापौर या भगव्याचाच होणार एवढं लक्षात ठेवा, असा ठाम विश्वास व्यक्त करत छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी भाजपला जोरदार टोला लगावला.
खरं तर काही घुबडं इकडं तिकडं फिरत असतील तर त्यांनी या मैदानावर किती लोक आहेत एकदा या घुबडांनी येऊन बघावं. कारण जसं मैदान बुक केलं तसं बरेचजण म्हणत होते की सांस्कृतिक मंडळावर सभा होईल का? तुमच्यातले एवढे लोक गेलेत. सभा घ्यायचं निश्चित केलं तेव्हा सभा मैदान भरणार नाही, ज्यावेळेस मैदान भरेल असं वाटलं तेव्हा शिवसैनिक येणार नाही, असे बोलणाऱ्या विरोधी पक्षाच्यां लोकांचे मी आभार मानतो. तुम्ही अशा पद्धतीने आव्हान दिल्यावर शिवसैनिक चेकाळला आणि या मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.
आपल्या जिल्ह्यातले अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले म्हणत होते. प्रचार फक्त आपल्या मुलीचा आणि मुलाचाच करतात बाकी काही करत नाही. मी त्यांना खुलं आव्हान दिलं होतं. हे मैदान मी ५ तारखेपासून ११ तारखेपर्यंत बुक केलं होतं. उद्या ११ तुमचा जो कोण आहे तो त्यांना हे मैदान सगळ्या व्यवस्थेसह उपलब्ध करून देतो. तुम्ही हे मैदान भरून दाखवा असं खुलं आव्हान मी दिलेलं आहे. पण यांच्यात दम नाही, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी विरोधकांवर टीका केली.
या मैदानावर पहिली सभा १२ एप्रिल १९८८ ला शिवसेनाप्रमुखांनी घेतली होती. जी पहिली महापालिका निवडणूक शिवसेना लढली होती आणि ६० पैकी २७ जागा शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या. त्याच्यानंतर पुन्हा एक विजयी सभा झाली होती ८ मे १९८८ ला त्या दिवशी मोरेश्वर सावे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि २७ च्या २८ जागा झाल्या होत्या. आणि त्याच दिवशी या मैदानावर शिवसेनाप्रमुखांनी या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर घोषित केलं होतं. चार-पाच दिवसांपूर्वी भाजपचं डोंबिवलीचं घुबड आलं होतं. ते म्हणत होतं छत्रपती संभाजीनगर नामकरण आम्ही केलं आणि पहिला महापौर आमचा होणार. तुम्ही स्वप्नं बघा, तुमचा महापौर होणार नाही. महापौर या भगव्याचाच होणार एवढं लक्षात ठेवा, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.
२०१९ मध्ये पहिल्यांदा उद्धवजी ठाकरेसाहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी या शहरासाठी त्यांनी तब्बल अडीच हजार कोटी रुपये निधी मंजूर केलेला होता. या अडीच हजार कोटींचं जे काम सुरू झालं होतं त्यावेळेस आपलं सरकार असताना २०२२ पर्यंत जवळपास ११००- १२०० कोटी रुपयांची विकास कामं पूर्ण झाली होती. आता हे जे उद्घाटनं करत आहेत काही लोक आयत्या बिळावर नागोबा ती उद्धवजी ठाकरेसाहेबांनी मंजूर केलेली कामं आहेत, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

































































