वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या बंगल्यावर दरोडा; नोकराने पूजाला बांधले, आईवडिलांना केले बेशुद्ध

आलिशान गाडीवर लाल दिवा लावल्यामुळे आणि खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवल्याने चर्चेत आलेल्या बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या घरात दरोडा पडला. खेडकर कुटुंबाच्या घरातील एका नोकराने पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केले. तसेच पूजाला दोरीने बांधून घरात चोरी केला. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या प्रकारने खळबळ उडाली आहे.

दरोडय़ाची माहिती  पुण्यातील चतुःशृंगी पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आपली मनःस्थिती ठीक झाल्यानंतर आपण तक्रार दाखल करू, अशी माहिती पूजा खेडकरने पोलिसांना दिली. घरात चोरी झाल्याची माहिती देणाऱया पूजा खेडकर यांनी गुन्हा दाखल न केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

 नेमके काय घडले

 पुण्यातील बाणेर रस्त्यावर खेडकर कुटुंबाचा बंगला आहे. या बंगल्यात खेडकर कुटुंबासह काही नोकर राहतात. त्यातील एक नोकर आठच दिवसांपूर्वी नेपाळहून आला होता. त्या नोकराने काल रात्री गुंगीचे औषध देऊन दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केले आणि आपल्याला बांधून ठेवले. त्यानंतर तो चोर घरातील सर्वांचे मोबाईल घेऊन पसार झाला, असे पूजा खेडकरने सांगितले. बांधून ठेवलेल्या अवस्थेत असलेल्या पूजा यांनी दाराच्या कडीचा उपयोग करून स्वतःचे हात मोकळे केले आणि पोलीसांना फोन केला. त्यानंतर चतुःशृंगी पोलिसांचे पथक खेडकर यांच्या घरी पोहचले असता दिलीप आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्धावस्थेत आढळून आले. पोलिसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यांची प्रकृती ठीक आहे.