
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण आम्ही टीव्हीवर बघायचो. आता तेच मैदान आहे. तीच शिवसेना आहे, मात्र शत्रू वेगळा आहे. काही गद्दार आहेत, तर काही गद्दार दिल्लीतील सत्तेचे गुलाम आहेत. या गद्दारांना मुंबईकर खडय़ासारखे बाजूला ठेवतील, असा हल्ला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज केला.
साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. त्याचा राग काहींच्या मनात अजूनही कायम असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. काल भाजपचे अण्णामलाई म्हणाले, मुंबई ही महाराष्ट्राची नाही ही भूमिका त्यांची आहे. महाराष्ट्र तोडण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे जवळजवळ सर्वच मुख्यमंत्र्यांना ते इथे आणत आहेत. सर्वांना बोलावण्याचं काम सुरू आहे. मात्र ठाकरे बंधू तुम्ही तुमच्या जिवावर तुमची निवडणूक लढवत आहात, असे काwतुक करीत आमची तुम्हाला साथ आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील
मी मागचं पोस्टर पाहिलं तर भावकी एकत्र आल्याचे दिसले. मी मुंबईत फिरताना दिसून आलेय की, ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईकरांना आनंद झालाय. राज्याच्या कानाकोपऱयातही हा आनंद साजरा होत आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर ठाकरे बंधूच ठरवतील, असा ठाम विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरे यांच्या अभ्यासू भाषणाचे कौतुक
जयंत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या मुंबईबद्दलच्या सखोल आणि अभ्यासपूर्ण भाषणाचे तोंडभरून काwतुक केले. आदित्य ठाकरे यांचे भाषण उत्तम झाले. त्यांना मुंबईची नस काय आहे आणि मुंबईसाठी काय करायचे आहे याची जाण आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुंबईची जबाबदारी आदित्यवर सोपवायला हरकत नाही, असे पाटील यांनी सांगितले.





























































