
मुंबईतले उद्योग गुजरातला पळवले जात असताना तोंडात ‘वडा-पाव’ कोंबून बसलेले फडणवीस रोजगार देण्याचा खोटा वायदा करीत आहेत व हजारो तरुणांच्या ‘चुली’ पेटवणाऱ्या वडा-पाव उद्योगाला कमी लेखत आहेत. मराठी माणसाचा वडा-पाव ‘इंटरनॅशनल’ झाला याचा अभिमान बाळगायचे सोडून ते वड्यात विष कालवत आहेत. दक्षिणेतील राज्यकर्ते ‘इडली’ विक्रीवर टीका करीत नाहीत. बिहारचे मुख्यमंत्री लिट्टी चोखाचा अभिमान बाळगतात. दिल्लीत ‘कचोरी समोसा’ हा उद्योग आहे. पंजाबात ‘मिस्सी रोटी आणि लस्सी’चा बोलबाला आहे. कर्नाटकात ‘बेन्ने डोसा’ जोरात आहे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झुणका-भाकर, वडा-पावचा द्वेष करतात. महाराष्ट्राला हे असे राज्यकर्ते लाभले हे दुर्दैवच म्हणायला हवे. वड्याच्या उकळत्या तेलात या वेळी मराठीद्वेष्ट्यांना तळून, भाजून काढले पाहिजे. वडा-पाव झिंदाबाद!
मुंबईसह 28 महानगरपालिकांचा प्रचार संपला आहे. ही निवडणूक गुंड, झुंड व धनदांडग्यांचीच असे वाटावे इतके वातावरण बिघडले आहे. पुण्यासारख्या शहरात खास निवडणुकीसाठी गुंड गजा मारणेची सुटका झाली आहे. मुंबईत भाजपने तामीळनाडूतून गुंड प्रवृत्तीची भयंकर माणसे आणून मराठी माणसांना धमकावण्याची ‘अण्णागिरी’ केली. मराठी माणसाच्या बाजूने एकही भाजपवाला किंवा ‘शहा’ सेनेवाला उभा राहिला नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी मराठी माणसाला धमकावणाऱ्या भाजपच्या ‘अण्णा’चे समर्थन केले. महाराष्ट्र स्थापनेपासून असे कधीच घडले नाही. त्यामुळेच चिडलेल्या मराठी माणसाने फडणवीस, मिंधेंच्या शिवाजी पार्कवरील सांगता सभेवर सपशेल बहिष्कार टाकला. 11 तारखेस त्याच शिवतीर्थावर ‘ठाकरे बंधूं’ची विराट सभा पार पडली. त्यास अलोट जनसागर लोटला, पण 12 तारखेच्या फडणवीस-मिंधेंच्या सभेस 22 हजार खुर्च्या लावल्या. त्यातल्या जेमतेम अडीच हजार खुर्च्या भरल्या व त्यातील बहुसंख्य ‘उपरे’ हे पैसे देऊन आणल्याचे उघड झाले. सभेचा फज्जा उडाला हे खरे, पण मतदारांना पैशाने विकत घेऊन निवडणुका जिंकण्याचा खेळ पुढच्या दोन रात्रीत होईल. प्रचार संपला असला तरी पैशांचा ‘जोर’ सुरू होईल. मंत्री गणेश नाईक सांगतात त्याप्रमाणे हा फक्त हरामाचा पैसा आहे. मराठी जनतेने हरामाचा पैसा घेऊन महाराष्ट्र विकू नये, आपल्या पोराबाळांचे भविष्य बिघडवू नये. ही लढाई मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे. मराठी माणूस या वेळी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील बेइमानांच्या मागे उभा राहणार नाही. हरामखोरांचा पैसा घेऊन त्यांना हरिश्चंद्र म्हणणार नाही.
महाराष्ट्राचा स्वाभिमान
मशालीप्रमाणे पेटला आहे, इंजिनाच्या वेगाने पुढे निघाला आहे. शिवाजी पार्कच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस ताळतंत्र सोडून बोलले. ते म्हणतात, ‘‘शिवसेनेने मराठी मुलांना फक्त वडा-पावच्या गाड्या दिल्या. आम्ही त्यांना उद्योग व रोजगार देऊ.’’ फडणवीसांचे हे विधान साठ वर्षांपूर्वी वडा-पाव खाऊन ‘मराठी’ न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्यांचा अपमान करणारे आहे. साठ वर्षांपूर्वी शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी मुंबईत मराठी तरुणांना नोकऱ्या, रोजगारातून डावलले जात होते. शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली मराठी माणूस एकवटला होता. त्या वेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले, ‘‘आज नोकऱ्या मिळत नसतील तर रिकामे बसू नका. वडा-पावच्या गाड्या लावा.’’ त्यानंतर मुंबईतील ‘वडा-पाव’ प्रसिद्ध झाला. ते एक रोजगार आणि आर्थिक उलाढालीचे साधन बनले. मुंबई-महाराष्ट्रात ‘वडा-पाव’च्या गाड्यांनी मोठा रोजगार मिळवून दिला. आज ‘वडा-पाव’ न्यूयॉर्क, इंग्लंड, युरोपियन राष्ट्रांत पोहोचला. पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘वडा-पाव’ मिळत असला तरी लोक आवडीने ‘वडा-पाव’ खातात तो शिवसेनेच्या गाड्यांवरच. वडा-पावचे महात्म्य आणि महत्त्व फडणवीस सारख्यांना कळणार नाही. कारण त्यांना कष्ट करून घामाची कमाई करणाऱ्या शेकडो कष्टकऱ्यांची घृणा वाटते. फडणवीस इडली-सांबर, ढोकळा-फाफडाचे कौतुक करतील, पण मराठी वडा-पाव दिसला की, त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू होतो. फडणवीस यांना हे माहीत असायला हवे की, गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत ‘वडा-पाव’ आवडीने खातात. मोठ्या वर्गाचे ते अन्न आहे. फडणवीसांचे लाडके अमित शहा मुंबईत येऊन ‘वडा-पाव’वरच ताव मारतात व हा ‘वडा-पाव’
शिवसैनिकांच्या गाडीवरचाच
असतो. महाराष्ट्राच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या चार-पाच पिढ्या मराठमोळ्या वडा-पाववरच पोसल्या याचा अभिमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असायला हवा. सगळ्यांचेच नशीब राजपुत्र जय शहासारखे नसते. जय शहाला कोणत्या गुणवत्तेवर क्रिकेट उद्योगात रोजगार मिळाला? फडणवीस म्हणतात, ‘‘आम्ही वडा-पाव नव्हे रोजगार देणार.’’ आम्ही विचारतो, मुख्यमंत्री महोदय, मुंबई-महाराष्ट्रातले उद्योग व गुंतवणूक गुजरातला पळवली जातेय. त्यामुळे मराठी माणसाचा रोजगार नष्ट झाला. रोजगार देणार कोठून? मुंबई-महाराष्ट्रातील उद्योगांत 80 टक्के भूमिपुत्रांना प्राधान्य मिळावे यासाठी शिवसेनेने लढा दिला. आज तुम्ही या लढाईवरच संकट आणले. मुंबईतले उद्योग गुजरातला पळवले जात असताना तोंडात ‘वडा-पाव’ कोंबून बसलेले फडणवीस रोजगार देण्याचा खोटा वायदा करीत आहेत व हजारो तरुणांच्या ‘चुली’ पेटवणाऱ्या वडा-पाव उद्योगाला कमी लेखत आहेत. मराठी माणसाचा वडा-पाव ‘इंटरनॅशनल’ झाला याचा अभिमान बाळगायचे सोडून ते वड्यात विष कालवत आहेत. दक्षिणेतील राज्यकर्ते ‘इडली’ विक्रीवर टीका करीत नाहीत. बिहारचे मुख्यमंत्री लिट्टी चोखाचा अभिमान बाळगतात. दिल्लीत ‘कचोरी समोसा’ हा उद्योग आहे. पंजाबात ‘मिस्सी रोटी आणि लस्सी’चा बोलबाला आहे. कर्नाटकात ‘बेन्ने डोसा’ जोरात आहे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झुणका-भाकर, वडा-पावचा द्वेष करतात. महाराष्ट्राला हे असे राज्यकर्ते लाभले हे दुर्दैवच म्हणायला हवे. वड्याच्या उकळत्या तेलात या वेळी मराठीद्वेष्ट्यांना तळून, भाजून काढले पाहिजे. वडा-पाव झिंदाबाद!

































































