26 जानेवारीपासून हार्बरवर एसी लोकल, सीएसएमटी ते पनवेल मार्गावर 14 फेऱ्या धावणार

वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना अखेर एसी लोकलच्या रूपात मोठे गिफ्ट मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हार्बरच्या प्रवासीसेवेत पहिली एसी लोकल दाखल केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल मार्गावर सोमवार ते शनिवार या कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत दररोज एसी लोकलच्या 14 फेऱ्या धावणार आहेत. अप आणि डाऊन दिशेने प्रत्येकी 7 फेऱ्या चालवण्यात येणार असल्यामुळे हार्बरचा प्रवास गारेगार होणार आहे.

सध्या पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर एसी लोकल धावतात. मात्र हार्बर मार्गाला एसी लोकलची प्रतीक्षा होती. अखेर हार्बरच्या प्रवाशांचे एसी लोकलमधून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. चेन्नई येथून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दाखल झालेली नवीन एसी लोकल ट्रेन हार्बर मार्गावर चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नवीन ट्रेन प्राधान्याने हार्बर मार्गावर चालवण्यासंबंधीत प्रस्ताव ऑपरेशन विभागाने मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठवला होता. त्याला मुख्यालय पातळीवरून मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार वाशी ते वडाळा रोड, पनवेल ते सीएसएमटी, पनवेल ते वडाळा रोड अशा प्रकारे एसी लोकल फेऱ्या धावणार आहेत. पनवेल येथून सीएसएमटीच्या दिशेने सायंकाळी 6.37 वाजता शेवटची एसी लोकल सुटेल, तर डाऊन मार्गावर सीएसएमटी येथून रात्री 8 वाजता पनवेलच्या दिशेने शेवटची लोकल सुटणार आहे.

सुट्टीच्या दिवशी विश्रांती

पहिल्या एसी लोकलला रविवारी तसेच इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विश्रांती दिली जाणार आहे. संबंधित सुट्टीच्या दिवसांत वेळापत्रकातील एसी लोकल फेऱयांच्या जागी नॉन-एसी लोकल चालवण्यात येणार आहेत.

वेळापत्रकावर  परिणाम होणार

एसी लोकलचे स्वयंचलित दरवाजे बंद होण्यास वेळ लागत असल्याने हार्बर लोकलसेवेच्या संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. यापूर्वी एसी लोकलच्या प्रस्तावाला प्रवाशांकडून विरोध झाला होता. नवीन एसी लोकलसेवेला प्रवासी कसा प्रतिसाद देताहेत, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.