
अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम केल्यानंतर सन्मानाने निवृत्ती हा महत्त्वाचा क्षण असतो. रेल्वेत निवृत्त होताना चांदीचे नाणे देण्यात येते, मात्र ही नाणीच खोटी ठरली आहेत. या नाण्यांमध्ये केवळ 0.23 टक्के चांदी असून, बाकीचे तांबे आहे. भोपाळमध्ये रेल्वेकडून झालेली ही फसवणूक एका निवृत्त कर्मचाऱयानेच उघडकीस आणली आहे.
पश्चिम मध्य रेल्वेत अनेक वर्षे सेवा केल्यानंतर ऑगस्ट महिन्यात डी. के. गौतम निवृत्त झाले. निरोप समारंभात गौतम यांना चांदीचे नाणे मिळाले होते. पैशांची गरज असल्याने त्यांनी हे चांदीचे नाणे विकण्याचा निर्णय घेतला. सोनाराने नाण्याची शुद्धता तपासली. तेव्हा नाण्यात चांदी केवळ 0.23 टक्के होती. याप्रकरणी डी. के. गौतम यांनी बजारिया पोलीस ठाण्यात तक्रार केली. रेल्वेने इंदुरमधील पंपनी मेसर्स वायबल डायमंड्सला 3640 नाणी तयार करण्याचे पंत्राट दिले होते. यातील 3631 नाणी भोपाळच्या रेल्वे जनरल डेपोत आली होती, मात्र या पंपनीने फसवणूक केल्यामुळे पंपनीला काळ्या यादीत टाकले आहे.



























































