
कसबा पेठ विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणारा प्रभाग क्रमांक 25मधील शुक्रवार पेठ येथील शिवाजी मराठा हायस्कूलमधील मतदान केंद्रातील खोली क्रमांक 4मधील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळ निर्माण झाला. कोणतेही बटन दाबले तरी ‘कमळ’ चिन्हाची लाईट लागत असल्याचा आरोप करत उमेदवारांसह कार्यकर्ते थेट मतदान केंद्रात शिरले आणि त्यांनी मतदान प्रक्रिया बंद पाडली. मतदान प्रक्रिया सुमारे दीड तास ठप्प झाली होती. मतदारांमध्ये गोंधळ उडाला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या उमेदवार रूपाली ठोंबरे-पाटील आणि मनसेचे गणेश भोकरे यांनी मतदान केंद्रात हजेरी लावत ईव्हीएम मशीन तत्काळ बदलण्याची व मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली.































































