ठसा – गंगाधर पटणे

>> प्रशांत गौतम

नांदेड जिह्यातील बिलोली येथील माजी आमदार, माजी नगराध्यक्ष राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष गंगाधरराव पटणे यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्र, ग्रंथालय चळवळ, शैक्षणिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्राची हानी झाली आहे. त्यांची एक वेगळी ओळख सांगायची तर ते साने गुरुजींच्या धडपडणाऱया मुलांपैकी एक होते. गुरुजींचा हा धडपडणारा मुलगा देहदान करून 90व्या वर्षी चिरंतनाच्या प्रवासाला गेला आहे. कथामालेचा पिंवा साने गुरुजींच्या संदर्भातील कोणताही कार्यक्रम असो, त्याचे निमंत्रण असो अथवा नसो, निमंत्रण पत्रिकेत नाव असो पिंवा नसो, कोणताही बडेजाव न ठेवता सर्वसामान्य प्रेक्षकाप्रमाणे यांची हजेरी असायची.

कोणत्याही मानपानाची अपेक्षा न ठेवणारे हे अजब रसायन होते. समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार करणाऱया पटणे यांना ग्रंथालय चळवळीची विलक्षण आस्था होती. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर भटपंती केलेली आहे. ग्रंथालय कर्मचाऱयांचे प्रश्न जाणून घेणे. सभा, संमेलन अधिवेशनातून सातत्याने आवाज उठवणे. प्रश्न टोकदारपणे मांडणे यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ व्यतित केला. गंगाधरराव महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे निष्ठावंत प्रसारक होते. आयुष्याच्या प्रवासात समाजसेवक, शिक्षणतज्ञ, राजकीय नेते, संपादक, विचारवंत अशा अनेकविध भूमिकांत ते काम करीत असत. यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मनात एक कुतूहलाची भावना कायम असायची. अनेक शाळा काढल्या तरी कशाचा दबाव नाही की कोणती अपेक्षा नाही. म्हणूनच मराठवाडय़ाच्या सामाजिक, राजकीय व पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. स्पष्टवत्तेपणा, प्रामाणिकपणा आणि तत्त्वनिष्ठा असे तीन महत्त्वाचे गुणविशेष त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते.

14 एप्रिल 1941 रोजी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील पेशाने वकील होते. शिक्षणासाठी वडिलांनी गंगाधररावांना हैदराबाद येथे शिस्तप्रिय असलेल्या विवेकवर्धिनी हायस्कूलमध्ये पाठवले. पुढे निजाम कॉलेजातून उच्चशिक्षण पूर्ण केले. भाषावार राज्य पुनर्रचनेनंतर नांदेड जिल्हा महाराष्ट्रात सामील झाला. आताच्या छत्रपती संभाजीनगरात येऊन त्यांनी विद्यापीठात प्रवेश घेतला. येथेच त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी संघटना केवळ स्थापनच केली नाही, तर तिचे दमदार नेतृत्वही केले. कायद्याचे शिक्षण घेत असताना चळवळ आणि पत्रकारिता सोबतच केली. काही काळ ‘रचना’ साप्ताहिकाचे उपसंपादक म्हणून काम केले. त्यांची राजकीय वाटचाल बघून तत्कालीन मंत्री विनायकराव पाटील यांनी स्वीय सहाय्यक व युवा काँग्रेसचे मराठवाडा संघटक ही जबाबदारी दिली. 1966 पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. वडील बंधू विश्वनाथरावांच्या प्रचारात सहभागी झाले. पुढील काळात डॉ. बापू काळदाते, अनंतराव भालेराव, डॉ. राममनोहर लोहिया यांचा सहवास व मार्गदर्शन लाभले. 1970च्या सुमारास समाजवादी पक्षाचे मुखपत्र ‘जनक्रांती’ हे सुरू केले. विधानसभा 72 साली लढवली. मात्र त्यात त्यांना अपयश आले, पण हार मानली नाही. 1978 साली जनता पक्षाने गंगाधररावांना बिलोली-देगलूर मतदारसंघात विधानसभा लढण्याची संधी दिली. त्यात ते विजयी झाले. 1980च्या निवडणुकीत पराभूत झाले. 1990 मध्येही असेच झाले. 1998 ते 2004 पर्यंत त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून काम बघितले. गंगाधररावांनी त्याआधी 1974 च्या सुमारास थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. नंतर 1986 ते 1991 या काळातही ते याच पदावर कार्यरत होते. या मतदारसंघातील अनेक विकासकामे मोठय़ा प्रमाणावर त्यांनी करून घेतली. या मतदारसंघासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कधीही विसरता येणार नाही. गंगाधरराव पटणे म्हणजे एक सच्चे, प्रामाणिक व चारित्र्यसंपन्न असे व्यक्तिमत्त्व होते.