मजुरीसाठी जाणाऱ्या महिलांच्या टेम्पोला भीषण अपघात; दोन ठार, 38 जखमी, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली, मुरबाडमधील माळशेजवाडीवर शोककळा

मुरबाडच्या माळशेजवाडी येथून जुन्नरकडे मजुरीसाठी जाणाऱ्या महिलांच्या टेम्पोला समोरून येणाऱ्या दुधाच्या भरधाव टँकरने धडक दिली. या भीषण अपघातात दोन मजूर महिला जागीच ठार झाल्या. तर 38 जणी गंभीर जखमी झाल्या. या अपघातामुळे माळशेजवाडीवर शोककळा पसरली आहे.

रोजगार हमी योजना केवळ नावालाच उरल्याने मुरबाड तालुक्यातील असंख्य आदिवासी पुरुष आणि महिलांना पोटाची खळगी भरण्यासाठी रोजच पुणे जिह्यातील जुन्नर, आळेफाटा व अन्य शहरांमध्ये मजुरीसाठी जावे लागते. दळणवळणाची साधनेही अपुरी असल्याने एका टेम्पोत या महिला चेंगरून बसतात आणि मजुरी करण्यासाठी जवळची गावे गाठतात. मुरबाड तालुक्यातील माळशेजवाडी येथील अनेक आदिवासी महिला एका टेम्पोत बसून मजुरीसाठी पुणे जिह्याकडे निघाल्या असताना त्यांच्या टेम्पोला समोरून येणाऱ्या दुधाच्या टँकरने जोरदार धडक दिली. ही घटना डुंबरवाडी येथे घडली. या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या तर 38 जणी गंभीर जखमी झाल्या.