
अनेकवेळा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडतो त्याची ओळख पटवता येत नाही.काही गुन्ह्यातील आरोपी १५-२० वर्ष फरार होऊन आपला ‘हुलिया’ बदलून वावरत असतात अशावेळी ते आरोपी पकडणे अशक्य होते अशा अनेक प्रश्नांवर रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ए आय तंत्रज्ञान वापरून उपाययोजना शोधली आहे.त्यांनी रेडस (आरएआयडीएस) हे ॲप तयार तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले आहे.या ॲपवरून छिन्नविछिन्न झालेल्या मृतदेहाचे छायाचित्र तयार करून त्याचा शोध घेता येतो तर फरार होऊन वेषांतर करून वावरणाऱ्या आरोपीलाही पकडता येणे शक्य होणार आहे.पोलिसांना घुमजाव देऊन फरार झालेले आरोपी आता १०८ रूपात दिसणार असून त्यांच्या मुसक्या आवळणे पोलिसांना शक्य होणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पोलीस दलात पारदर्शकता,कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने मिशन प्रोजेक्ट आणि डिजिटल ॲप्लिकेशन सुरू केले आहे.एआय चा वापर करून रत्नागिरी ॲडव्हान्स इंटरग्रेटेड डाटा सिस्टीम म्हणजेच रेडस हे ॲप तयार केले आहे.या ॲपमध्ये दोन टूल आहेत.पहिला देवदृष्टी टूल त्यामध्ये फरार झालेल्या आरोपीचा शोध घेणे सोपे होणार आहे.काही गुन्ह्यातील आरोपी १५ ते २० वर्षे फरार असतात त्यानंतर ते वेशभूषा बदलून किंवा वयोमानामुळे त्यांच्या चेहरा आणि शरीरयष्टीत बदल होतात अशावेळी आरोपी शोधणे कठीण होते.फरार आरोपी दाढी वाढवतात किंवा टक्कल करतात.वेशभूषा बदलतात.अशा आरोपींचा शोध रेडस ॲप वेगळ्या पद्धतीने घेणार आहे.अशा फरार आरोपींची छायाचित्रे या ॲपमध्ये अपलोड केली जाणार आहेत.ते छायाचित्र १०८ वेगवेगळ्या वेशभूषेत रूपांतरित केले जाणार आहे.त्यामुळे त्या आरोपीने वेशांतर केले तरी तो पकडता येणे सोपे होणार आहे.
दुसरे टूल आहे ते देव रूपरेखा.यामध्ये फरार आरोपीच्या स्केचवरून हुबेहुब छायाचित्र तयार करता येणार आहे.त्यामुळे आरोपी शोधून काढणे सोपे होणार आहे.तसेच बेपत्ता व्यक्तींचाही शोध घेता येऊ शकतो.तसेच सडलेल्या अवस्थेतील मृतदेहाचे छायाचित्र या ॲपद्वारे करता येणार असल्याने त्या व्यक्तीचा शोध घेता येणार आहे.भारतीय न्याय संहितेतील कलमांची माहिती या ॲप द्वारे मिळणार आहे.
हिस्ट्री शिटर आरोपी जागेवर आहे की नाही हे पोलिसांना तपासणे ॲपद्वारे शक्य होणार आहे.जिल्हास्तरावरच्या पोलीस अधिकाऱ्यांना जर हिस्ट्री शीटर आरोपीला भेटून चौकशी करायची असेल तर त्याचा पत्ता संबंधित पोलीस ठाण्यात घेण्याची गरज भासणार नाही.तो पोलीस अधिकारी रेडस ॲपवरून त्या आरोपीचे लोकेशन तपासून त्याच्या घरी जाऊन तो तिथे आहे की नाही हे पाहू शकतो.































































