
मुंबई महापालिका निवडणुकीत 89 जागा जिंकूनही भाजपच्या राज्य नेतृत्वात नाराजी असल्याचे पक्षातील सूत्रांकडून समोर आले आहे. 2002 नंतर कोणत्याही एका पक्षाने स्वतंत्रपणे मिळवलेला हा सर्वाधिक आकडा असला, तरी तो अपेक्षेपेक्षा कमी ठरल्याची भावना पक्षात आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
भाजपने सुरुवातीला किमान 110 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते, मात्र निकाल त्यापेक्षा बऱ्याच खाली राहिल्याने प्रचारात नेमके काय चुकले, याचा आंतरिक आढावा सुरू करण्यात आला आहे. मुंबईतील पक्षसंघटनेतील समन्वयाचा अभाव, उमेदवार निवडीत झालेल्या चुका आणि राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या ‘मराठी अस्मिता आणि मुंबईच्या अभिमानाच्या’ मुद्द्याला प्रभावी प्रत्युत्तर देता न येणे, ही प्रमुख कारणे असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.
महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांआधी भाजपने 155 हून अधिक जागा लढवून 120–125 जागा जिंकण्याचा विचार केला होता. मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार वाटाघाटी करून आपल्या पक्षासाठी 91 जागा मिळवल्या आणि भाजपकडे 137 जागा राहिल्या. त्यानंतर भाजपने लक्ष्य 110 जागांवर आणले; प्रत्यक्षात मात्र 89 जागांवरच समाधान मानावे लागले.
एका भाजप नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, निवडणुकीपूर्वी इतर पक्षांतील 11 विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांची संख्या 93 (स्वतःचे 82 धरून) झाली होती; मात्र ती संख्या देखील टिकवता आली नाही. प्रचाराच्या अखेरीस ठाकरे बंधूंनी उभा केलेला मराठी मुद्दा प्रभावी ठरला आणि भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याचे त्यांनी मान्य केले.
सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठा विजय साधता न आल्याबद्दल मुंबई युनिटकडे नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी शिवाजी पार्कवर झालेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचा, ज्यात ‘मुंबई व मराठी ओळख वाचवा’ असे आवाहन करण्यात आले, याचे ठळक परिणाम झाल्याचे नेतृत्वाचे मत आहे. त्याच सभेत राज ठाकरे यांनी अदानी समूहाच्या मागील दशकातील वाढीबाबत केलेली मांडणी प्रभावी ठरल्याचेही भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र सोमवारी झालेल्या महायुतीच्या शिवाजी पार्कवरील सभेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने राजकीय नुकसान झाल्याचेही मान्य करण्यात आले.
15 जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकांत 29 महापालिकांमध्ये भाजपने एकूण 49 टक्के जागा जिंकल्या असून मुंबईत 64 टक्क्यांहून अधिक स्ट्राइक रेट नोंदवला आहे. तरीही देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत अपेक्षा अधिक असल्याने समाधान नाही, असे नेते सांगतात. मराठी मतदारांमध्ये झालेला तीव्र कलबदल निर्णायक ठरल्याचे भाजपचे मत आहे. या निकालानंतर महायुतीतील समन्वयावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. जागावाटपातील तणावाचा परिणाम प्रचारात दिसून आला, तसेच तिकीट न मिळालेल्या इच्छुकांना शांत करण्यासाठी समांतर यंत्रणा नसल्याने नुकसान झाल्याचे एका शिवसेना नेत्याने मान्य केले.
ज्या दिवशी महानगरपालिकेचा निकाल लागला त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. अद्याप पूर्ण निकाल आले नाही म्हणून इतक्यात काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती. तसेच या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबईचे पदाधिकारीही उपस्थित होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत नव्हता, उलट त्यांच्या चेहऱ्यावर चिंताच दिसत होती.
























































