
पालघघरच्या वाढत्या शहरीकरणामुळे येथील लोकसंख्याही वाढू लागली असून त्याचा ताण आरोग्य सेवेवरही पडू लागला आहे. त्यातच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम गेल्या चार वर्षांपासून लटकले असल्यामुळे पालघरवासीयांची उपचारासाठी सुरतपर्यंत २०० किमी तर मुंबईपर्यंत १०० किमी इतकी फरफट होत आहे. मुंबई, गुजरातच्या रुग्णालयात अत्यवस्थ रुग्ण पोहोचेपर्यंत त्याचे प्राण कंठाशी येत आहेत. हे रुग्णालय कधी पूर्ण होणार, असा संतप्त सवाल पालघरवासीयांनी केला आहे.
पालघर जिल्ह्यातील वाढते औद्योगिकीकरण त्यामुळे आदळणारे बाहेरील कामगारांचे लोंढे, वेगाने सुरू असणारी बांधकामे त्यामुळे वाढणारी लोकसंख्या, आरोग्य विभागावर पडणारा ताण, आपत्कालीन सेवांची गरज ही बाब लक्षात घेऊन पूर्ण क्षमतेच्या जिल्हा रुग्णालयाची गरज आहे. त्यादृष्टीने २०२२ मध्ये या जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला कार्यारंभ आदेश मिळाला आणि हे रुग्णालय २४ महिन्यांत पूर्ण होईल, अशी ग्वाही देण्यात आली होती.
२०० खाटांच्या या जिल्हा रुग्णालयासाठी सुरुवातीला २०९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. परंतु बांधकाम खर्च वाढत गेला आणि या रुग्णालयाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे साडेतीनशे कोटींपर्यंत गेला. निधीअभावी हे काम कासवाच्या गतीने सुरू झाले आहे. आतापर्यंत या इमारतीचे अवघे ६० ते ६५ टक्के इतकेच बांधकाम पूर्ण झाले आहे. जिल्हा प्रशासक मात्र त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करत आहे. ठेकेदार मात्र ८५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याचे ठोकून सांगत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्य संस्थांच्या जुन्या इमारतीची क्षमता अपुरी पडत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना नाशिक, मुंबई, ठाणे किंवा गुजरातला पाठवावे लागत आहे. आपत्कालीन विभाग, अतिदक्षता विभाग, डायलिसिस आणि ट्रामाकेअर यांसारख्या अत्यावश्यक सुविधा खूपच मर्यादित असल्याने योग्य वेळी उपचार मिळण्यास विलंब होत आहे.
























































