
प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने दिल्लीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत प्रदूषणाची पातळी “अत्यंत खराब” वरून “गंभीर” आणि “धोकादायक” वर आली आहे. सोमवारी (19 जानेवारी) सकाळी दिल्लीतील अनेक भागांत 418 ते 665 पर्यंत AQI नोंदवले गेले. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान पंजाब आणि हरियाणात तण जाळण्यात येतात, तसेच दिवाळीत फटाके फोडल्याने दिल्लीतील प्रदूषण चिंतेचा विषय असतो. हिवाळा सुरू झाला की या प्रदूषणात घट होते. मात्र यंदा हिवाळा सुरू झाला, जानेवारी उजाडला तरी प्रदूषण कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी दिल्ली सरकारने शहरातील नविन बांधकामावर स्थगिती, डिझेल वाहनांवर बंदी, ट्रक प्रवेश प्रतिबंधित, कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचारी आणि हायब्रिड शाळा असे नियम लागू केले. मात्र, प्रतिकूल हवामान आणि नियमांचे उल्लंघन यामुळे सरकारच्या उपाययोजनांचा पाहिजे तसा परिणाम दिसून आला नाही.
ऑक्टोबर 2025 मध्ये दिल्लीतील प्रदूषणात वाढू लागले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये प्रदूषणाची स्थिती अधिक गंभीर होत गेली. दरम्यान, डिसेंबरमध्ये प्रदूषण कमी होण्याची चिन्हे दिसत असतानाच जानेवारी 2026 मध्ये प्रदूषणाची स्थिती पुन्हा गंभीर झाली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी 2026 मध्ये वाढती थंडी आणि वाऱ्याचा कमी वेग (GRAP) यामुळे प्रदूषणात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
दाट धुके, दव आणि वाऱ्याच्या कमी वेगामुळे प्रदूषकांचे प्रमाण वाढत असून यामुळे नागरिकांना गंभीर आरोग्य समस्यांनी ग्रासले आहे. प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळाही हायब्रिड मोडमध्ये सुरू आहेत. विमानांच्या उड्डाणांवरही प्रदूषणाचा परिणाम दिसून येत आहे. दाट धुक्यामुळे विमानांच्या उड्डाणांना विलंब होत आहे.
























































