
पुणे विमानतळावर शनिवारी रात्री अकासा एअरच्या (Akasa Air) प्रवाशांना प्रचंड त्रासाच्या अनुभवाचा सामना करावा लागला. पुणे ते अहमदाबाद या विमानाला तब्बल ११ तास विलंब झाल्यामुळे १५० हून अधिक प्रवाशांचे हाल झाले. विमानाची वेळ वारंवार बदलणे, गेट नंबरमधील सततचे बदल आणि माहितीचा अभाव यामुळे संतप्त प्रवाशांनी विमानतळावर जोरदार निदर्शने केली.
अकासा एअरचे विमान (QP-1509) शनिवारी रात्री १०:१० वाजता पुण्याहून सुटणार होते. मात्र, सुरुवातीला हे विमान रात्री ११:२० वाजता जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर वेळ बदलून ११:५५ आणि पुन्हा रात्री १२:३० करण्यात आली. या गोंधळात प्रवाशांना गेट नंबर ५, ७ आणि ९ दरम्यान चकरा माराव्या लागल्या.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पुण्यात येणाऱ्या या विमानाला पार्किंग बे न मिळाल्यामुळे उशीर झाला होता. अखेर जेव्हा विमान पुण्यात उतरले, तेव्हा वैमानिकाच्या कामाचे तास (Duty Hours) संपले होते. नियमांचे पालन करत वैमानिकाने उड्डाण करण्यास नकार दिला आणि तो निघून गेला. यामुळे रात्री ३:३० च्या सुमारास विमान रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. ऐनवेळी इतर विमानांची तिकिटे १५ हजार रुपयांपर्यंत गेल्याने प्रवाशांसमोर मोठे संकट उभे राहिले.
प्रवाशांचे हाल आणि एअरलाईन्सचा दावा
प्रवाशांनी आरोप केला आहे की, त्यांना पहाटे ५ वाजेपर्यंत साधे अल्पोपहारही देण्यात आले नाहीत. काहींना हॉटेलमध्ये नेण्यात आले, पण तिथेही जागा उपलब्ध नव्हती. अखेर रविवारी सकाळी ९:१० वाजता विशेष विमानाने (QP-6950) हे प्रवासी अहमदाबादला रवाना झाले.
याबाबत अकासा एअरच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘कार्यकारी कारणांमुळे आणि सुरक्षिततेच्या नियमांनुसार वैमानिकाच्या ड्युटीची वेळ संपल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. आम्ही प्रवाशांना नाश्ता आणि निवासाची सोय उपलब्ध करून दिली होती.’


























































