थलपती विजय CBI च्या रडारवर! करूर दुर्घटनेप्रकरणी TVK प्रमुख दुसऱ्यांदा चौकशीसाठी हजर

तामिळनाडूतील करूर चेंगराचेंगरीप्रकरणात टीव्हीके नेता, अभिनेता विजय थलपतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून सीबीआयकडून समन्स पाठवण्यात येत होते. दरम्यान, आता सीबीआयने विजय यांची चौकशी सुरू केली आहे. यासाठी विजय रविवारी चेन्नईहून एका खास विमानाने दिल्लीला पोहोचल्याचे वृत्त आहे. यापूर्वी तपास यंत्रणेने 12 जानेवारी रोजी विजय यांची सुमारे सहा तास चौकशी केली होती.

तामिळनाडूत करूर येथे 27 सप्टेंबर 2025 रोजी विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी झाली होती. या अपघातात 41 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील सुरक्षा व्यवस्थाबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले.

विजय यांच्या सभेची वेळ ही दुपारी 3 ते रात्री 10 अशी होती. मात्र त्यांच्या अधिकृत्त सोशल मीडियावर विजय दुपारी 12 वाजता येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे विजय यांना पाहण्यासाठी 10 हजार लोकांची गर्दी होईल असा अंदाज असताना 20 हजारांहून जास्त जनसमुदाय घटनास्थळी पोहोचला होता. त्यामुळे पोलिसांना गर्दी नियंत्रणात ठेवता आली नाही. यामुळे ही दुर्घटना घडली.

12 जानेवारी रोजी झाली होती चौकशी
विजयची यापूर्वी 12 जानेवारी 2026 रोजी 6 तास चौकशी करण्यात आली होती. 13 जानेवारी रोजी होणारी पुढील चौकशी पोंगल सणामुळे विजयच्या विनंतीवरून पुढे ढकलण्यात आली होती. सुरुवातीच्या चौकशीदरम्यान, विजयने अपघातासाठी तो किंवा त्याचा पक्ष जबाबदार नसल्याचे सांगितले. तेथील परिस्थिती आणखी बिकट होऊ नये म्हणून तो लवकर निघून गेला असेही त्याने सांगितले. त्यामुळे आता होणाऱ्या चौकशीवर सगळ्याचे लक्ष लागले आहे.

करूर चेंगराचेंगरी प्रकरणी विजय थलापतीला सीबीआयचे समन्स