एकमेकांवर दबाव तंत्र वापरण्यासाठीही शिंदे-फडणवीसांना ठाकरे लागतात, सुषमा अंधारे यांची टीका

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस झाले तरी मुंबईत महापौर कोणाचा होणार हे स्पष्ट झालेले नाही. महापौर पदाचा सस्पेन्स दिवसागणिक वाढत चालला आहे. शिंदे गटाला फुटीची भीती वाटत आहे. त्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहेत. मुंबई महापालिकेवर कुणाचा महापौर बसणार यावरून प्रसारमाध्यमांमध्ये सध्या उलट सुलट बातम्या येत आहेत. या बातम्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप व शिंदे गटाला फटकारले आहे.

”शिंदे आणि फडणवीस या दोघांची महापौर पदावरून चाललेली रस्सीखेच माध्यमांमध्ये रंगत आहे. यात दोघांनीही ठाकरेंना मध्ये ओढण्याचे कारण नाही. शिंदे फडणवीस या दोघांनी एकमेकांशी काय सौदेबाजी करायची ती खुशाल करावी. स्वतःचा मोलभाव वाढवण्यासाठी ठाकरेंना ऑफर किंवा ठाकरेंकडून प्रस्ताव अशा पद्धतीचे लुटूपुटुचे डाव खेळू नयेत. तुम्हाला टीका करायलाही ठाकरे आणि सत्तेत बसण्यासाठी एकमेकांवर दबाव तंत्र वापरण्यासाठीही ठाकरे कार्ड का वापरावे लागत आहे? असा सवाल अंधारे यांनी ट्विटरवरील पोस्टमधून केला आहे.

तसेच या पोस्टमधून त्यांनी ‘ठाकरेंचे नगरसेवक कुठेही नॉटरीचेबल नाहीत. त्यांना कुठल्याही हॉटेलमध्ये डांबून ठेवलेलं नाही. ठेवायची गरज नाही. त्यामुळे टेबल न्यूज पेरण्याचा बालिश प्रयत्न कोणीही करू नये”, असे देखील सत्ताधाऱ्यांना खडसावून सांगितले. सोबत ”लोकांनी ज्या विश्वासाने आम्हाला मते दिलेली आहेत तो विश्वास आमच्यासाठी सत्तेपेक्षा लाखमोलाचा आहे. आम्ही लढतोय लढत राहू. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय..”, असे त्या या पोस्टमध्ये म्हणाल्या.