थरारक! एसी डब्यात चिमुरडा 2 तास सापासोबत खेळत होता, सीटखाली पडताच ट्रेनमध्ये उडाला हलकल्लोळ

अजमेरहून जबलपूरला जाणाऱ्या दयोदय एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये साप असल्याच्या अफवेने मोठी खळबळ उडाली. एका सीटच्या खाली सापासारखी आकृती दिसल्याने एका प्रवाशाने “साप आहे… साप आहे” असा आरडाओरडा केला. यामुळे संपूर्ण डब्यात घबराट पसरली आणि प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली. घाबरलेले प्रवासी आपली जागा सोडून मुलाबाळांसह सुरक्षित अंतरावर उभे राहिले. या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांना सुमारे दोन तास घाबरून प्रवास करावा लागला.

साप असल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन तातडीने सतर्क झाले आणि त्यांनी याबाबतची माहिती आरपीएफच्या जवानांना दिली. यानंतर सवाई माधोपूर ते कोटा दरम्यान आरपीएफच्या जवानांनी डब्यात सतत शोधमोहीम राबवली. तसेच, ट्रेन कोटा स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच सर्पमित्र गोविंद शर्मा यांना देखील या घटनेबाबत कळवण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेने कोटा स्टेशनवर एक अतिरिक्त डबाही तयार ठेवला होता, जेणेकरून गरज पडल्यास प्रवाशांना दुसऱ्या कोचमध्ये हलवता येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 10 च्या सुमारास ट्रेन कोटा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोहोचली. यावेळी रेल्वे पोलीस आणि सर्पमित्रांनी सुमारे 10 मिनिटे एसी कोचमधील प्रत्येक सीट, बर्थ आणि गॅलरीची बारकाईने तपासणी केली. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही तिथे कोणताही जिवंत साप आढळला नाही. तपास सुरू असतानाच प्रवाशांकडून या घटनेमागचे एक धक्कादायक आणि तितकेच विचित्र सत्य समोर आले.

चौकशीत असे स्पष्ट झाले की, डब्यात एका लहान मुलाकडे दीड फुटांचा प्लास्टिकचा बनावट साप होता. खेळताना तो साप मुलाच्या हातातून निसटून सीटच्या खाली गेला. दुसऱ्या एका प्रवाशाची नजर त्यावर पडली आणि त्याने त्याला खरा साप समजून आरडाओरडा केला. केवळ एका खेळण्यामुळे दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. सत्य समजल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आणि ट्रेन पुढे रवाना झाली.