मध्य प्रदेशातून मेफेड्रोन ड्रग्जची तस्करी; मुंब्रा पोलिसांच्या पाच जणांना बेड्या, 27 कोटींचे 13 किलो एमडी जप्त

मध्य प्रदेशातून मेफेड्रोन ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आलेल्या आंतरराज्य टोळीतील पाच जणांच्या मुंब्रा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बासू सय्यद, रामसिंग गुर्जर, कैलास बलाई, मनोहर गुर्जर आणि राजू उर्फ रियाज मन्सुरी अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी २७ कोटी २१ लाख ७७ हजार ७५० रुपयांचा १३ किलो ६२९ ग्रॅम एमडी जप्त केला आहे.

मुंब्रा येथील बिलाल हॉस्पिटलजवळ एक जण एमडी ड्रॅग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून बासू सय्यद याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याकडून पोलिसांना २३ ग्रॅम एमडी मिळाले होते. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हे एमडी मध्य प्रदेशातील रामसिंग गुर्जर, कैलास बलाई यांच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने कसोशीने तपास करत राम आणि कैलास या दोघांवर झडप घातली. त्यांच्याकडून पोलिसांना ७ कोटी ३० लाख ५६ हजारांचे ३ किलो ५१५ ग्रॅम एमडी मिळाले. हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज व्यक्त करत पोलिसांनी पुढील तपास केला असता या टोळीत मनोहर गुर्जर आणि राजू उर्फ रियाज मन्सुरी यांचादेखील समावेश असल्याचे निष्पन्न झाले.

रतलाम जिल्ह्यातून दोघांना अटक
मनोहर आणि राजू हे दोघेही मध्य प्रदेशात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रतलाम जिल्ह्यातून त्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून पोलिसांना १९ कोटी ९१ लाख २० हजारांचे ९ किलो ९५६ ग्रॅम एमडी पोलिसांना मिळाले. या पाचही जणांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता ते आंतरराज्य टोळीत सक्रिय असल्याचे उघड झाले आहे.