हिंदुस्थानात खेळा, नाहीतर बाहेर पडा! टी-20 वर्ल्ड कपबाबत आयसीसीचा बीसीबीला अंतिम इशारा, बांगलादेशच्या सहभागाबाबत आयसीसीची बुधवार डेडलाइन

आगामी टी-20 वर्ल्ड कप सुरू होण्याआधीच मोठय़ा वादात सापडला आहे. या वादावर जालीम उपाय काढताना आयसीसीने बीसीबीला थेट इशारा दिलाय. हिंदुस्थानातच सामने खेळले पाहिजेत, अन्यथा त्यांची जागा दुसऱया संघाला दिली जाईल. म्हणजेच हिंदुस्थानात खेळा, अन्यथा बाहेर पडा. त्यासाठी 21 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय कळवण्याची मुदत दिली आहे. त्या तारखेपर्यंत भूमिका स्पष्ट झाली नाही तर बांगलादेशचे स्थान धोक्यात येईल आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडला वर्ल्ड कप प्रवेशाची लॉटरी लागेल.

बांगलादेशचा हट्ट; हिंदुस्थान नको, श्रीलंका हवी

गेल्या आठवडय़ात आयसीसी आणि बीसीबी यांच्यात दोन बैठका झाल्या. ढाक्यात झालेल्या बैठकीत बांगलादेशने पुन्हा ठाम भूमिका घेत वर्ल्ड कप खेळायचा आहे, पण हिंदुस्थानात नाही. पर्याय म्हणून श्रीलंकेचे नाव पुढे करण्यात आले. मात्र आयसीसीने वेळापत्रक किंवा गटरचनेत कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले.

बांगलादेशची मुख्य हरकत सुरक्षेची आहे, मात्र आयसीसीने स्वतंत्र सुरक्षा संस्थेच्या अहवालाचा हवाला देत सांगितले की, हिंदुस्थानात कोणताही गंभीर धोका नाही आणि सुरक्षा व्यवस्था उच्च दर्जाची आहे.

सामने कोलकाता आणि मुंबईतच होणार

सध्याच्या वेळापत्रकानुसार बांगलादेशचे गट सामने कोलकाता आणि मुंबई येथेच होणार आहेत. 7 फेब्रुवारीला कोलकात्यात पहिला सामना त्यानंतर आणखी दोन सामने कोलकात्यात, तर अखेरचा सामना मुंबईत खेळला जाणार आहे. बांगलादेशने या संकटावर तोडगा काढण्यासाठी गट बदलण्याची मागणीही केली होती, मात्र तीदेखील आयसीसीने फेटाळली.

नकार दिल्यास स्कॉटलंडला संधी

आयसीसीशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, बांगलादेशने अखेरपर्यंत हिंदुस्थानात येण्यास नकार दिल्यास स्कॉटलंड संघाला रँकिंगच्या आधारे थेट स्पर्धेत सामील केले जाईल. स्कॉटलंडचा संघ आजवर सहा टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे. तो गेल्या चारही स्पर्धांत खेळला होता, मात्र यावेळी त्यांचा संघ पात्र ठरू शकला नव्हता. मात्र बांगलादेशमुळे त्यांना लॉटरी लागू शकते. या पर्यायी व्यवस्थेबाबत आयसीसीने अजूनही स्कॉटलंड क्रिकेट मंडळाशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधला नसल्याचेही समोर आले आहे.

पाकिस्तानचा हस्तक्षेप, वाद अधिक चिघळला

या प्रकरणात आता पाकिस्तानही उघडपणे उतरला आहे. बांगलादेश सरकारने पाकिस्तानशी संपर्क साधून पाठिंब्याची मागणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून बांगलादेशला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, बांगलादेशचा प्रश्न सुटला नाही तर पाकिस्तानही आपल्या सहभागाबाबत पुनर्विचार करू शकतो, असा संकेत देण्यात आला आहे.