
मालाड पूर्व येथे मेट्रो लाईन-7 च्या पुलाखाली आज धावत्या बसला भीषण आग लागली. बसमधील प्रवाशांनी गाडीबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मालाड पूर्वच्या कुरार गाव येथे मेट्रो लाईन-7 च्या पुलाखालून मालाडच्या दिशेने जाणाऱया बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यानंतर काही क्षणात बसने पेट घेतला. आग लागल्याचे समजताच बसचालक आणि वाहकाने प्रवाशांना खाली उतरवले. आग इतकी प्रचंड होती की, आगीचे लोळ मेट्रोच्या पुलापर्यंत जात होते. ऐन सकाळच्या वेळेस आग लागल्याची घटना घडल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दहिसरच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. नेमकी आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. फॉरेन्सिक अहवालानंतर काही बाबी स्पष्ट होणार आहेत.


























































