
माहीममध्ये आज एका केमिस्टच्या दुकानात एक तरुण चेहऱ्यावर रुमाल बांधून व हातात गन घेऊन घुसला, पण केमिस्टवाल्याने त्याला रोखून पकडले आणि माहीम पोलिसांच्या ताब्यात दिले. अखेर पूर्ववैमनस्यातून त्या तरुणाने हे कृत्य केल्याचे समजले. त्याच्या हातातली गन ही एअरगन निघाली. याप्रकरणी माहीम पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले.
माहीमच्या कापड बाजारात आज ही घटना घडली. मंगळवारी सकाळी 35 वर्षीय सौरभ नावाचा तरुण चेहऱ्याला रुमाल बांधून प्लस मेडिकलमध्ये घुसला. त्याने सोबत आणलेली गन बाहेर काढून ती केमिस्टचालकावर रोखली; मात्र न डगमगता केमिस्टने सौरभला पिटाळून लावले. त्याला पकडून माहीम पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्याकडील गनची तपासणी केली असता ती एअरगन असल्याचे निष्पन्न झाले. पूर्ववैमनस्यातून आरोपीने हे कृत्य केल्याचे समजते. केमिस्टचालकाच्या तक्रारीवरून सौरभविरोधात माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशाचप्रकारे यापूर्वीदेखील आरोपीने एअरगनचा धाक दाखवत घाबरविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.






























































