कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड, (45) याचा मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. कॉमेड पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी असल्याने गायकवाडला प्रत्येक रविवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागत होती, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.

गायकवाडला सोमवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे. समीर गायकवाड हा गेल्या चार वर्षांपासून कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात जामिनावर सुटला होता. सध्या तो सांगलीतील विकास चौक परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होता.