
अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत चालला असून आखातामध्ये युद्धाचे ढग जमू लागले आहेत. इराणमध्ये सुरू असलेल्या भीषण जनक्षोभामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर इराणनेही जशास तसे प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली. यामुळे ट्रम्प यांची चांगलीच सटकली आणि त्यांनी आता इराण सरकारला कडक शब्दांमध्ये इशारा दिला आहे. जर इराणमधील हिंसाचार असाच सुरू राहिला, तर संपूर्ण देश उद्ध्वस्त करू, असे खळबळजनक विधान ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती बिकट होत चालल्याचे दिसताच अमेरिकेने आपल्या नागरिकांना तातडीने इराण सोडण्याचे निर्देश देत लष्करी कारवाईचा इशारा दिला. यानंतर इराणने अमेरिकेला युद्धाची धमकी दिली. या धमकीला आता ट्रम्प यांनी उत्तर दिले आहे. काहीही अघटित घडले तर संपूर्ण देश उद्ध्वस्त करू, अशा स्पष्ट सूचना मी दिल्या आहेत. आम्ही त्यांना पृथ्वीच्या नकाशावरून पुसून टाकू, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली.
इराणवर लष्करी कारवाई केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी दिला. अमेरिकेने इराणविरुद्ध कोणतीही कारवाई केल्यास आम्ही त्यांना प्रचंड उत्तर देऊ, असे खामनी म्हणाले. तसेच इराणच्या सशस्त्र दलाचे प्रवक्ते जनरल अबोलफजल शेकर यांनीही अमेरिकेला इशारा दिला. आमच्या नेत्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्यास आम्ही केवळ हल्ला करणाऱ्यांचे हात छाटणार नाहीत तर त्यांचा संपूर्ण खात्मा करू, असे ते म्हणाले.
इराणधील परिस्थिती बिकट
दरम्यान, इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनामध्ये आतापर्यंत 4 हजार 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 26 हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. महागाई आणि इराणी चलनाचे अवमूल्यन याविरोधात डिसेंबर 2025 पासून लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांनी खामने राजवट उलथवून टाकण्याची मागी केली आहे. तर दुसरीकडे या आंदोलनामागे अमेरिका आणि इस्रायलचा हात असल्याचा आरोप इराण सरकारने केला आहे.































































