निवडून आलेला माल ताबडतोब बाजारात विकायला येतो, संजय राऊत यांचे टीकास्त्र

महानगरपालिका निवडणूकांनंतर राज्यात नगरसेवकांवरून सुरू असलेल्या घोडेबाजारावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. ”आम्ही निवडून आणायचे, घसे, नरडी गरम करायची, साधनं आम्ही द्यायची आणि हा निवडून आलेला माल लगेच विकायला येतो”, अशा शब्दात त्यांनी या घोडेबाजारावर सडकून टीका केली.

“शह काटशहाच्या राजकारणात नितिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये हेच आमचं म्हणनं आहे. कल्याण डोंबिवलीत जे घडलं ती पक्षाची भूमिका नाही असं सांगण्यात आलं. राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे आम्हाला लक्षात आलं आहे. जर तुम्हाला ही भूमिका घ्यायची होती. जर तुम्हाला कल्याण डोंबिवलीत अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही शिवसेनेसोबत युती करायला नको होती. शिंद्यांच्या बाबतीत आमची भूमिका कठोर आणि कडवट आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. शिंद्यांकडे दोन पर्याय होते. तिथे शिंदे भाजप एकत्र येऊ शकतात. तिथे ते एकत्र येऊन सरकार बनवू शकले असते. इतरांना त्यात घुसायचं कारण नव्हतं”, असं संजय राऊत म्हणाले.

कल्याण डोंबिवलीत झालेला निर्णय हा खालच्या पातळीवर घेतला आहे. तुम्ही एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येता आणि पक्षाच्या मूळ भूमिकेपासून दूर जाता. दोन शिवसेनेचे मशालवर निवडून आलेले देखील त्यांच्यासोबत गेले आहेत. सगळ्यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. निवडून आलेला माल ताबडतोब बाजारात विकायला येतो. आम्ही निवडून आणायचे, घसे, नरडी गरम करायची. साधनं द्यायची आणि हा निवडून आलेला माल लगेच विकायला येतो. अॅमस्टरडॅमला कधी गेलात तर माल काचेच्या कपाटात विकायला कसा उभा असतो तसे हे सगळे काचेच्या कपाटात लेबल लावून उभे आहेत. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेलं आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेला कोणता प्रस्ताव आलेला आहे का असे पत्रकारांनी विचारताच संजय राऊत म्हणाले की, आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो. आम्ही शिंद्यांसोबत कदापी जाणार नाही. इतर पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील”, असे संजय राऊत यांनी सांगितले.

”कल्याण डोंबिवली संदर्भातील पूर्ण माहिती उद्धव ठाकरेंना होती. पडद्यामागे जे चालू आहे त्याची खडा न खडा माहिती आम्हाला आहे. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. ज्या प्रकारचं संशयाचं वातावरण सुरू झालेलं आहे. शिंदे विरोधात जो राग आहे तो पाहिल्यावर लक्षात येईल की अशा प्रकारची युती मराठी माणून मान्य करत नाही. मुंबईत आम्हाला यश मिळालं कारण लोकांना शिंदेंना, गद्दारांना धडा शिकवायचा होता. राज ठाकरे स्वतंत्र नेते आहेत. त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत निर्णय आहे. तरी स्थानिक पातळीवरील ज्यांनी हा निर्णय घेतला आहे त्यांची मराठी माणसाच्या मनातील विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे”, असेही ते म्हणाले.

”कणकवलीत एक आघाडी स्थापन झाली होती. त्यात सर्व पक्ष होते. आम्ही तिथे शिंद्यांसोबत गेलो नाही. एका लहानश्या नगरपालिकेसाठी स्थापन झालेल्या सर्व पक्षीय आघाडीत शिवसेना सामील झाली. शिंद्यांसोबत निवडणुकीनंतर कुणी युती केली असेल तर ते मला दुर्बिणमधून शोधावे लागेल’, असे ते म्हणाले.

”विकास हा एक भोंदू आणि ढोंगी शब्द आहे. 70 हजार कोटींचा घोटाळा करून अजित पवार जातात ते विकासासाठी, एकनाथ शिंदे जातात विकासासाठी, या चिन्हावर निवडून येऊन त्या चिन्हात प्रवेश करायचा विकासासाठी. या विकास शब्दावर आता बंदी आणली पाहिजे. मोदी व फडणवीसांच्या काळात विकास हा शब्द बदनाम झाला आहे. जसा गोडसे हा अनपार्लमेंट्री शब्द आहे. तसा विकास हा शब्द देखील असंसदीय असायला हवा. मी विकासासाठी गेलो असं नाही मी माझ्या कुटुंबासाठी गेलो, माझ्या स्वार्थासाठी गेलो. विकासाचं दुसरं नाव आता स्वार्थ आणि ढोंग झालेलं आहे”, असे ते म्हणाले.