
>> शुभांगी बागडे
साहित्यसंस्कृतीची समृद्धता जपणाऱया जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलने 19व्या वर्षात पदार्पण करताना जागतिक साहित्यिक चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. नुकत्याच झालेल्या या महोत्सवाविषयी… पुस्तकं आणि पुस्तकप्रेमी यांचं एक अतूट नातं असतं, एक स्वतंत्र जग असतं. वाचनप्रेमी ज्या जगात रमून जातात, त्या जगातील नावीन्याची आस शमवण्याची जबाबदारी पार पाडणारे उत्कृष्ट साहित्य महोत्सव ही भारताची नवी साहित्यिक-सांस्कृतिक ओळख जगभरात होत आहे. पुण्यातील पुस्तक महोत्सवानंतर दिल्लीतील विश्व पुस्तक महोत्सवाकडे साऱयांचे लक्ष लागले होते. त्याच काळात चेन्नईतील साहित्य महोत्सवाने साऱयांचे लक्ष वेधले, तर कोलकाता लिटरेचर मिट आणि केरळ साहित्य महोत्सव सध्या संपन्न होत आहेत. या मांदियाळीत समस्त साहित्यप्रेमींचे लक्ष वेधून घेणारा आणि आकर्षणाचा उत्सव ठरला तो जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल.
जगभरातील साहित्यप्रेमी ज्याची वाट पाहत असतात तो ‘जयपूर लिटफेस्ट’ नुकताच 15 ते 19 जानेवारीदरम्यान जयपूरमधील ‘क्लार्क आमेर हॉटेल’ या भव्य आणि देखण्या वास्तूत पार पडला. विचारांची समृद्ध मेजवानी असणाऱया या महोत्सवाने या 19 वर्षांत जागतिक साहित्यिक चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. जगातील श्रेष्ठ लेखक, विचारवंत, मानवतावादी, राजकारणी, उद्योगपती, क्रीडा, मनोरंजन विश्वातील व्यक्तिमत्त्वांना एका मंचावर आणत साहित्य-संस्कृतीचा होणारा जागर आता व्यापक ठरू पाहतोय. अभिव्यक्ति स्वातंत्र्य, विचारपूर्ण चर्चा आणि संवाद यांचे महत्त्व अधोरेखित करणे हे या महोत्सवाचे वैशिष्टय़. यंदाचे महोत्सवाचे हे 19 वे वर्ष होते व विविध सत्रांत सुमारे 500 वत्ते सहभागी झाले होते. विविध देशांच्या व प्रदेशांच्या भाषा, संस्कृती आणि विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारी एकूण 266 सत्रे आयोजित करण्यात आली होती. इतके मोठाले आकडे म्हणून हा सोहळा यशस्वी ठरत नाही, तर सोहळ्याच्या समृद्धतेचा परिपाक हा त्यातील वैचारिक, सांस्कृतिक प्रवाहांना एका अत्युच्च शिखरावर नेण्याने अधिक उंचावला जातो. हा समृद्धतेचा वसा आपल्याकडील साहित्य संमेलनापर्यंत येणं ही मराठी साहित्यविश्वासाठी सध्याची निकड ठरावी इतकी वानवा आपल्या सांस्कृतिक, साहित्यविश्वात दिसून येत आहे.
पाच दिवसांच्या या साहित्यमैफिलीत कान, मन आणि मेंदू यांची ‘माझे जिवींची आवडी’ अशी अवस्था होते. वाचन, साहित्यप्रेमी ज्याची आस आणि ध्यास बाळगून असतात ते सारं इथे एका प्रतलावर येतं. त्यातलं प्रवाहीपण सामावून घेणं, त्यातून प्रगल्भ होत जाणं हेच खरं या कसोटीवर उतरल्यासारखं. साहित्य-संस्कृतीच्या जगापासून फारकत असलेल्यांचेही कोरडेपण इथे अंश न अंश निवळून जाईल असं भारलेलं इथलं वातावरण प्रत्येकाने अनुभवावे असेच.
जयपूर लिटफेस्टच्या मुख्य पटलावरील चर्चांमध्ये यावेळी जागतिक युद्ध, जागतिक राजकारण हे विषय होते. युद्धाच्या उंबरठय़ावरील देशांमधील दाहकता, त्याच्याशी निगडीत अर्थकारण, राजकारण आणि वास्तव वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा महोत्सवाचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. व्यावसायिकदृष्टय़ाही यशस्वी आणि साहित्य समृद्धतेची परंपरा कायम राखणारा हा महोत्सव लेखिका व महोत्सव संचालक नमिता गोखले, विल्यम डॅलरिम्पल आणि निर्माते व टीमवर्क आर्ट्सचे मुख्य संजॉय के रॉय यांच्या नेतृत्वाखाली संपन्नरीत्या पार पडला.
इंग्रजी भाषेने जगभरातील साहित्याच्या वाटा आपल्यापाशी मोकळ्या केल्या, पण मायमराठीतली माया ओढ लावणारीच. जयपूर लिटफेस्टमध्ये मराठीतील प्रकाशनांची वैभवशाली परंपरा यानिमित्ताने जाणून घेता आली. भाषा कोणत्याही साच्यात बांधता येत नाही. जगातल्या कोणत्याही साहित्याची भाषा प्रवाही असते. आपल्या मायमराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिच्या बोली, प्रमाण भाषा याबाबत बरंच बोललं गेलं. अजूनही यावर विचारमंथन सुरू आहे. त्याच्याशी निगडीत नवे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. या विचारमंथनाचे ध्येय भाषा तिच्या आत्मीय स्वरातून उमटत राहावी, बोलली जावी हेच असावं.
याबाबत ‘मराठी प्रकाशनाच्या वैभवशाली परंपरा’ या सत्रात मराठी भाषा विभागाचे डॉ. किरण कुलकर्णी यांनी एक सुंदर वाक्य उद्धृत केलं, ‘भाषा ही नदीप्रमाणे असते. सगळं सामावून घेत ती तिचं प्रवाहीपण अबाधित राखते.’ जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल आपल्या भाषेचं प्रवाहीपण अबाधित राखण्यासाठी आपण काय करू शकतो हे सांगणारी एक वाटच आहे.



























































