
>> अभय मिरजकर
लातुरात मोफत जेवणाचे डबे पोहोचवणारा ‘श्री समर्थ अन्नसेवा’ हा उपक्रम आदर्श ठरत आहे. या उपक्रमाची प्रेरणा घेऊन आता धाराशीव शहरातही असा उपक्रम या वर्षी सुरू करण्यात आला आहे.
‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या सहकाराच्या मूलमंत्राचा उपयोग करत लातूर शहरातील ब्राह्मण समाजातील युवकांद्वारे हा उपक्रम राबविला जात आहे. शहरातील एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबाला जेवणाचे डबे पोहोचवले जातात. त्यामुळे त्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळतो. या उपक्रमासंदर्भात माहिती देताना सुयोग जोशी यांनी सांगितले की, विश्वास लातूरकर, भूषण दाते, शिरीष कुलकर्णी, सुयोग जोशी, योगेश काळे, सुधाकर जोशी, सारंग आयाचित, शैलेश कुलकर्णी, गोपाळ जोशी, विशाल आयाचित यांनी श्री समर्थ अन्नसेवा हा उपक्रम सुरू करण्यात पुढाकार घेतला.
एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर संबंधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यानंतर त्या कुटुंबाला सर्वप्रथम आवश्यकता भासते ती अन्नाची. पूर्वी गावखेडय़ात शेजारी ही व्यवस्था करत असत, परंतु शहरात जिथे अंत्यसंस्कारांवेळी लवकर कोणी उपस्थित राहत नाहीत तिथे त्या कुटुंबाला अन्न कोण देणार? अनेक कुटुंबांत तीन दिवस घरात चूल पेटवली जात नाही. काही ठिकाणी तर केवळ ज्येष्ठ नागरिक असतात. ते बाहेर पण जाऊ शकत नाहीत.त्यामुळे ही संकल्पना सर्वांनी पुढे घेऊन जाण्याचे ठरवले. तीन वर्षांपूर्वी सुरू केलेला हा उपक्रम पूर्णपणे दानशूर व्यक्तींच्या पाठिंब्यावर चालवला जात आहे.
श्री समर्थ अन्नसेवा उपक्रमाकडे माहिती मिळाली की, संबंधित कुटुंब शहरात कुठेही राहत असेल त्या ठिकाणी मोफत तीन दिवस जेवणाचे सकाळ – संध्याकाळ असे दोन वेळा डबे पुरवण्यात येतात. या उपक्रमाची समाजातील कुटुंबांना माहिती व्हावी यासाठी दरवर्षी समाजाचा स्नेहमेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्याला शहरातील किमान 700 ते 800 कुटुंबांतील सदस्यांना आमंत्रित केले जाते.
मागील वर्षी या उपक्रमाचा लाभ शहरातील 80 कुटुंबातील सदस्यांना झाला. आत्तापर्यंत 500 जेवणाचे डबे पोहोचवले गेले. संबंधित कुटुंबांतील सदस्यांकडून एक रुपयाही घेतला जात नाही. असा उपक्रम प्रत्येक समाजातील व्यक्तींनी राबवला तर समाजातील एक मोठी समस्या दूर होऊ शकते.
























































