
>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, [email protected]
स्त्रियांनी केलेल्या विडंबनपर काव्याची साहित्यजगात दखल घेतली गेली नाही. सुरुवातीच्या काळातील अशा अनेकींच्या लेखनात कदाचित काव्यरचनेची सफाई कमी असेल, पण या कवयित्रींकडे स्वतंत्र विचार होता, स्वतःचा दृष्टिकोन होता.
स्त्रियांच्या आत्मचरित्रलेखनाची स्वतंत्र वाटचाल रमाबाई रानडे यांच्या आत्मचरित्रापासून सुरु झाल्याचं आपण गेल्या लेखात पाहिलं. कवितेच्या बाबतीत नवा विचार किंवा नवी जाणीव दिसली ती इंदिराबाई तेलंग यांच्या ‘भावनातरंग’ या कवितासंग्रहापासून. कविता हा एक साहित्यप्रकार आहे, कलाप्रकार आहे. तिच्या निर्मितीसही प्रतिभागुण असावा लागतो, स्वतःचा विशेष अनुभव असावा लागतो याचं भान ज्यात सुस्पष्टपणे उमटलं आहे अशा या कविता 1925 ते 1936 या काळात लिहिलेल्या आहेत. तसा निर्देश त्यावर आहे. हा संग्रह मुंबईहून प्रकाशित झाला आहे आणि त्यावर त्या काळातील मुंबईतील सुधारकी वातावरणाचा प्रभाव जाणवतो. त्या कविता ‘महिला’, ‘कला’, ‘संजीवनी’ इत्यादी नियतकालिकांत प्रकाशित झाल्या होत्या.
त्यांच्या आधीच्या अनेक कवयित्रींनी जो पारंपरिक सूर लावला तसा सूर इंदिराबाई लावत नाहीत हे विशेष. संसाराकडे कवयित्री ओझं म्हणून पाहत नाही किंवा ‘पदरी पडलं पवित्र झालं’ अशा निरीच्छेनेही बघत नाही, तर तिला त्यात आनंद वाटतो. ती पतीला देव मानत नाही किंवा ‘कशी या त्यजू पदाला’ म्हणत स्वतला त्याची दासीही मानत नाही. ती त्याची सहचरी, मैत्रीण होऊ पाहते. त्याला क्वचित टोमणेही देते. ‘मज हवी गं गोरीपान’ अशी त्याची चेष्टाही करते. आपल्या कवितेत त्यांनी पुरुषस्वभावाचे बारकावे छान टिपले आहेत. आपली साक्षर बायको हॉटेलची बिले वाचू शकते हे लक्षात न आलेल्या, बाहेर खाऊन आल्यावर घरच्या अन्नाला चव नाही म्हणणाऱ्या नवरेमंडळींची खेळकर चेष्टा त्यांनी केली आहे. नरम विनोदी, काहीशी उपहासपर अशा शैलीतली ही कविता खास ‘त्यांचीच’ आहे. आणि तरीही विडंबन कवितेच्या संकलनात त्यांच्या कवितेची कोणीही दखल घेतलेली नाही. स्त्रियांच्या सर्वच निर्मितीकडे कसे उपेक्षेने पाहिले जात होते, ते जाणवले की खंत वाटते आणि पुरुषप्रधान व्यवस्थेचा निषेध मनात उमटतो. अरुणा ढेरे यांनी असं म्हटलं आहे की “बालकवी आणि गोविंदाग्रज यांच्या परंपरेतील एक चांगली कवयित्री म्हणून इंदिराबाईंची नोंद वाङ्मयेतिहासानं करायला हवी होती असे खात्रीने म्हणावेसे वाटते.’’ याच काळातल्या शांताबाई परदेशी आपल्या कवितेमधून स्त्राr-पुरुष समानता हवी असं स्पष्टपणे म्हणत होत्या.
संसार गाडी चालाया समान
प्रभु निर्मिती दोन्हि चक्रांस जाण
पतीवीण जैसी गती ना सतीला
सतीवीण तैसी गती ना पतीला
असं त्यांनी लिहून ठेवलं आहे. या काळातल्या कितीतरी कवयित्रींनी बालगंधर्व, टिळक, रानडे, गांधी, सत्याग्रह, केसरीमधले लेख यांचेही उल्लेख आपल्या कवितेमधून केले आहेत. त्यावरून त्या आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करत होत्या, तिचा आपापल्यापरीने अर्थ लावत होत्या हे दिसतं.
जानकीबाई कानिटकर यांनी तर एका कवितेत अॅनी बेझंट तुरुंगातून सुटल्या या घटनेचा उल्लेख करून ‘बिंझाट बाई सुटल्या’ म्हणून पेढे वाटण्याचा उच्चार केला आहे. अकोल्याच्या दुर्गाबाई जोशी यांच्या 1940 साली प्रकाशित झालेल्या ‘अशोकवन’ या
कवितासंग्रहाच्या शीर्षकावर ‘वंदे मातरम्’ ही घोषणा आहे. यातल्या बऱ्याच कविता देशभक्तीपर आहेत. कोपले देव बंदिस्त। स्वातंत्र्य रवीचा अस्त। अविचार विकतसे स्वस्त। घ्या जवळी दलित बंधूला। पावतील मग नवसाला।। असा नव्या विचारांचा जागरही त्या करतात. लक्ष्मीबाई लेले यांच्या ‘नीरांजन’ या संग्रहाच्या मुखपृष्ठावर तलवार उपसून घोडय़ावर स्वार झालेल्या शिवछत्रपतींचे चित्र आहे. ‘पुढाऱयांना एक प्रश्न’, ‘खादी वापरा’, ‘चरखा’, ‘चित्तरंजन दास’ ही त्यांच्या काही कवितांची शीर्षके विलक्षण बोलकी आहेत. शिवाय ‘स्त्रियांच्या दुर्दशेची मुळे ही पुरुषप्रधान व्यवस्थेतच आहेत’ हे त्या अगदी ठामपणे सांगतात.
या अनेकींच्या लेखनात कदाचित काव्यरचनेची सफाई कमी असेल, पण या कवयित्रींकडे स्वतंत्र विचार, दृष्टिकोन होता. त्यामुळे स्त्रियांच्या लेखनाच्या या आविष्कारांची दखल आवर्जून घ्यायला हवीच आहे.
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)
























































