लेख – संयम राखणे हाच खरा विवेक

>> डॉ. समिरा गुजरजोशी

पूर्वाह्ने प्रतिबोध्य पजवनान्युत्सार्य नैशं तम । कृत्वा चन्द्रमसं प्रकाशरहितं निस्तेजसं तेजसा ।

मध्याहे सरितां जलं प्रविसृतैरापीय दीप्तैः करैः । सायाह्ने रविरस्तमेति विवश किं नाम शोच्यं भवेत् ।।

सकाळी सूर्य उगवतो तेव्हा कमलवन जागृत होते आणि रात्रीचे अंधार दूर पळून जातो. त्याच सूर्यतेजामुळे चंद्राचा प्रकाश फिका पडतो. दुपारी आपल्या तेजस्वी किरणांनी तो नद्यांचे पाणी चमकवतो आणि संध्याकाळी तोच सूर्य विवश होऊन अस्ताला जातो. हे सगळे नैसर्गिक असताना यात शोक करण्यासारखे काय आहे? ही अन्योक्ती यश, सत्ता आणि प्रभाव यांच्या क्षणभंगुरतेवर भाष्य करते.

सकाळचा उत्कर्ष, दुपारचा प्रभाव आणि संध्याकाळची माघार हे सर्व अपरिहार्य आहे. जो हे चक्र समजून घेतो, तो उगाच गर्व करत नाही आणि पतन आले तरी खचत नाही. राजकारण, जीवन किंवा नेतृत्व कुठेही परिस्थिति बदलते तेव्हा संयम राखणे हाच खरा विवेक आहे. तारुण्य, प्रौढावस्था आणि वृद्धत्व यांचाही या संदर्भात विचार करता येतो. त्या त्या वेळी ती अवस्था स्वीकारणे म्हणजे परिपक्वता होय.