
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 556 रहिवाशांना फेब्रुवारीत नव्या प्रशस्त घराचा ताबा देण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे 160 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या बीडीडीवासीयांचे 500 चौरस फुटाच्या अलिशान घरात राहण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील इमारत क्र. 1 मधील डी व ई विंगमधील 556 रहिवाशांना ऑगस्टमध्ये घराचा ताबा देण्यात आला होता. आता आणखी दोन इमारतींचे काम पूर्ण झाले असून आठवडय़ाभरात अग्निशमन दलाचे मुख्य अधिकाऱ्यांकडून इमारतींची पाहणी केली जाणार आहे. अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळताच भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. फेब्रुवारीत 556 रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे नियोजन आहे, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
n बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाचे काम सुरू झाले. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे 121 जुन्या चाळींतील 9 हजार 689 रहिवाशांचे पुनर्वसन होणार असून येथे 40 मजल्यांच्या 34 पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत.























































