
प्रभादेवी येथील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेची वाहतूक 12 तास बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुलाचा सांगाडा हटवण्यासाठी सर्वात मोठय़ा ब्लॉकबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्याचदृष्टीने कमीत कमी लोकल ट्रेन रद्द करण्याच्या हेतूने ब्लॉकचे नियोजन केले जात आहे. सुरुवातीच्या 15 तासांऐवजी 12 तासांचा ब्लॉक घेण्याबाबत मध्य रेल्वे व ‘महारेल’मध्ये बोलणी झाली आहे. त्यानुसार रेल्वे बोर्डाकडे सुधारित प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गिकेवर विस्तारलेला ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडून त्याजागी वरळी-शिवडी उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. 12 सप्टेंबरपासून एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम हाती घेतले होते. दोन महिन्यांत पाडकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र चार महिने उलटले तरी पाडकाम पूर्ण झालेले नाही. रेल्वे मार्गिकांवरील लोखंडी सांगाडा हटवण्याचे मुख्य काम बाकी आहे. यासाठी मध्य रेल्वेवर मोठा ब्लॉक घेण्याची गरज आहे. तो ब्लॉक 15 तासांचा घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र या कालावधीत अनेक लोकल फेऱया रद्द कराव्या लागतील, तसेच मेल-एक्स्प्रेस वाहतुकीत मोठे बदल करावे लागतील. या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या 15 तासांऐवजी 12 तासांचा ब्लॉक घेण्याबाबत मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयाने तयारी दर्शवली आहे. त्यानुसार सुधारित प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर पाच तासांच्या ब्लॉकसाठी
‘महारेल’ची विनंती
पश्चिम रेल्वेच्या मार्गिकेवर एल्फिन्स्टन पुलाच्या 7 पैकी 5 पॅनेल हटवण्यात आले असून 2 पॅनेल काढायचे बाकी आहेत. या कामासाठी ‘महारेल’ने पश्चिम रेल्वेकडे पाच तासांच्या मेगाब्लॉकसाठी विनंती केली आहे. मात्र मध्य रेल्वेच्या 12 तासांच्या ब्लॉकसाठी रेल्वे बोर्डाने वेळीच मंजुरी न दिल्यास पूल पाडकामाला विलंब होणार आहे.
























































