
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मोठा निर्णय घेत बांगलादेशची टी-२० वर्ल्ड कपमधून हकालपट्टी केली. शनिवारी (दि. २४) ‘आयसीसी ‘ने अधिकृत पत्र पाठवीत बांगलादेशला हा निर्णय कळविला. ४ जानेवारीपासून सुरू असलेल्या वादानंतर अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डला (बीसीबी) मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे बोर्डासह खेळाडूंनाही मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. ‘आयसीसी ‘ने बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला स्पर्धेत सहभागी करून घेतले आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत हिंदुस्थान दौऱ्याला नकार दिल्यामुळे हा सारा वाद पेटला होता. यंदाच्या ‘आयपीएल ‘मधून मुस्तफिजूर रहमानला वगळल्यानंतर या प्रकरणाला अधिकच धार चढली होती. या वादातून अखेर बांगलादेशचा वर्ल्ड कपमधून पत्ता कट होऊन स्कॉटलंड संघाला मोठी लॉटरी लागली आहे.
हिंदुस्थानात स्कॉटलंड खेळणार चार सामने
सध्याच्या वेळापत्रकानुसार बांगलादेशला कोलकाता आणि मुंबई येथे साखळी सामने खेळायचे होते. मात्र, आता त्याऐवजी स्कॉटलंडचा ग्रुप ‘सी’ मध्ये समावेश करण्यात आला आहे. हा पहिलाच प्रसंग नाही. २००९ मध्ये झिम्बाब्वेने टी-२० विश्वचषकातून माघार घेतल्यानंतर स्कॉटलंडला संधी देण्यात आली होती. आता बांगलादेशने हट्ट धरत हिंदुस्थानात खेळण्यास नकार दिल्याने, क्रमवारीच्या आधारे स्कॉटलंडला स्थान देण्यात आले आहे.
शुक्रवारीच पाठवण्यात आला अधिकृत ई-मेल
‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, ‘आयसीसी’चे अध्यक्ष जय शाह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी शुक्रवारी दुबईत उपस्थित होते. त्याचदिवशी उशिरा बीसीबी अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांना ई-मेलद्वारे आयसीसीचा निर्णय कळवण्यात आला. आयसीसीच्या एका सूत्राने सांगितले की, हिंदुस्थान दौऱ्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी दिलेल्या २४ तासांच्या मुदतीत बीसीबीकडून अधिकृत उत्तर न आल्याने हा निर्णय घेण्यात आला.
प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा ठपका
सूत्रानुसार, आयसीसीला अधिकृत माहिती देण्याआधीच ढाक्यात पत्रकार परिषद घेऊन बीसीबीने प्रोटोकॉलचे उल्लंघन केले. त्यामुळे बांगलादेशला स्पर्धेतून वगळण्यात येत असल्याचे स्पष्टपणे कळवण्यात आले. बांगलादेशच्या क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ नजरुल यांनी सुरक्षेचे कारण देत हिंदुस्थान दौरा न करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आयसीसीने वारंवार सुरक्षेची हमी दिली होती. दरम्यान, क्रिकेट स्कॉटलंडने आम्हाला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाल्याचे अद्यापि अधिकृतपणे कळविले नसल्याचे सांगितले आहे. मात्र, लवकरच सूचना मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.



























































