उल्हास नदीवर नगर परिषदेने व्यवस्था न केल्याने गणेशभक्तांची गैरसोय; बदलापुरात गाड्यांचे हेडलाईट, मोबाईल टॉर्चवर बाप्पांचे विसर्जन

माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने बदलापूरमधील अनेक ठिकाणी गणपती बाप्पांचे वाजतगाजत आगमन झाले. मात्र दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना गणेशभक्तांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. उल्हास नदीवर नगर परिषदेने कोणतीही व्यवस्था न केल्याने मोठी गैरसोय झाली असून बाप्पांचे विसर्जन गाड्यांचे हेडलाईट व मोबाईल टॉर्चवर करण्याची वेळ आली. नगर परिषदेच्या या भोंगळ कारभाराचा सर्वत्र निषेध होत आहे.

माघी गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाटात पार पडतो. घरगुती गणपतीबरोबरच काही ठिकाणी सार्वजनिक गणपतींचीही प्रतिष्ठापना केली जाते. सर्व गणपतींचे विसर्जन हे उल्हास नदीवर केले जाते. नगर परिषदेने टेबल, निर्माल्यासाठी जागा, पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात गणपती विसर्जन करण्यासाठी भक्त आले असताना नदीवर कोणतीही व्यवस्था दिसून आली नाही. अगदी लाईटही नव्हते. अशाच परिस्थितीत भक्तांना गाड्यांच्या लाईटचा आधार घेऊन गणेश मूर्तीचे विसर्जन करावे लागले.

नगराध्यक्षा, मुख्याधिकारी कुठे आहेत?
नुकत्याच झालेल्या बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व उमेदवारांनी नागरिकांना विकासाचे गाजर दाखवले. नागरी समस्या सोडवण्यासाठी आम्हाला मतदान करा असे आवाहन करण्यात आले, पण गणेश विसर्जनासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभारण्यासाठी पाठपुरावा करावा असे कोणाला का वाटले नाही अशा शब्दात आपला संताप बदलापूरकरांनी व्यक्त केला आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुचिता घोरपडे तसेच मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी विसर्जनाची व्यवस्था करण्यासाठी का पुढाकार घेतला नाही, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.