Crime News – क्रिकेट, बिअर आणि किरकोळ कारणावरून वाद, धावत्या कारच्या दाराला लटकवून मित्राला झाडावर नेऊन आदळलं

बंगळुरूत मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका स्थानिक क्रिकेट सामन्यात हरल्यानंतर दोन मित्रांमध्ये सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की, एका 27 वर्षीय आयटी इंजिनिअरने आपल्या मित्राला धावत्या कारच्या दाराला लटकवून जाणीवपूर्वक झाडावर नेऊन आदळले. या भीषण अपघातात 28 वर्षीय प्रशांत नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना कारच्या डॅशबोर्ड कॅमेरात कैद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत आणि रोशन हेगडे हे दोन मित्र त्यांच्या क्रिकेट संघाच्या पराभवानंतर एकत्र पार्टी करत होते. मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांच्यातील जुना वाद पुन्हा उफाळून आला. यानंतर रोशन आपल्या कारमधून निघून जात असताना, त्याला रोखण्यासाठी प्रशांतने कारच्या दाराला धरले आणि तो फुटरेस्टवर उभा राहिला. मात्र, रोशनने गाडी थांबवण्याऐवजी तिचा वेग वाढवला आणि प्रशांतला बाहेर लटकलेल्या अवस्थेतच कार वेगाने चालवली.

व्हायरल व्हिडीओमध्ये असे दिसून आले की, रोशनने प्रशांतचा जीव घेण्याच्या उद्देशाने कार अत्यंत वेगाने चालवून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर नेऊन धडकवली. झाडावर झालेल्या या जोरदार धडकेमुळे बाहेर लटकलेला प्रशांत कार आणि झाड यांच्यामध्ये चिरडला गेला. त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर जखमा झाली. जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेत आरोपी रोशन हेगडे देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेब्बागोडी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा (कलम 302) गुन्हा दाखल करून रोशनला अटक केली आहे, तसेच त्याची कारही जप्त करण्यात आली आहे. किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा असा निर्घृणपणे बळी घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.