सोरतापवाडी ‘हुंडाबळी’ प्रकरणात सरपंच सासूसह पती अटकेत

हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथील विद्यमान महिला सरपंचाच्या घरात घडलेल्या ‘हुंडाबळी’ प्रकरणात उरुळी कांचन पोलिसांनी सरपंच सुनीता कारभारी चौधरी व पती रोहन कारभारी चौधरी यांना अटक केली आहे. विवाहित महिलेचा बळजबरीने गर्भपात केल्याचाही आरोप असून, त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस सखोल तपास करत आहेत.

दीप्ती रोहन चौधरी (30) या विवाहितेने हुंडय़ासाठी होणाऱया मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या (दि. 24) केली होती. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सरपंच आणि विवाहित महिलेची सासू सुनीता चौधरी, पती रोहन चौधरी, सासरे कारभारी चौधरी व दीर रोहित चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत विवाहितेच्या आईने फिर्याद दिली आहे.

दीप्तीला माहेरून पैसे आणण्यासाठी सातत्याने दबाव टाकण्यात येत असल्याचे, तसेच गर्भपातासाठी जबरदस्ती करण्यात आल्याची कुटुंबीयांची तक्रार आहे. त्या अनुषंगाने आता उरुळी कांचन पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करत आहेत.