चंद्रपुरात शिवसेना-काँग्रेस एकत्र, अडीच-अडीच वर्षे महापौर पद; उद्धव ठाकरे यांच्याशी वडेट्टीवार यांची चर्चा

चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक 27 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अडीच-अडीच वर्षे महापौर असावा अशा फॉर्म्युल्यावर यावेळी चर्चा झाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार यांनी आज दुपारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासंदर्भात आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आमच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. काँग्रेसच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद अडीच-अडीच वर्षांसाठी दोन्ही पक्षांना मिळायला हवे, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे. त्या प्रस्तावाला आमची काहीच अडचण नाही. मजबूत संख्याबळ असेल तर चांगले काम करता येते. प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून त्यांना याबाबत कल्पना देऊ. तेही उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

महापौर ठरवताना शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीप गिडे यांच्याशी चर्चा करून समन्वयाने एक नाव निवडावे, असेही उद्धव ठाकरे यांनी सुचवले असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. पहिली अडीच वर्षे शिवसेनेला महापौरपद हवे आहे. त्याऐवजी काँग्रेसला प्रथम संधी देण्याची विनंती आम्ही उद्धव ठाकरे यांना केली, असे वडेट्टीवार म्हणाले. पहिली अडीच वर्षे आमच्यातल्या कोणत्या पक्षाचा महापौर होणार यापेक्षा महाविकास आघाडीचाच महापौर व्हावा ही आमची इच्छा असल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले.

चंद्रपुरातील पक्षीय बलाबल

चंद्रपूर महापालिका निवडणुकीत एकूण 66 जागांपैकी सर्वाधिक 27 जागा काँग्रेसने जिंकल्या असून शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी 34 हा आकडा गाठण्यास काँग्रेस आणि शिवसेनेला तिथे काहीच अडचण येणार नाही. इतर पक्षांपैकी भाजपला 23, जनविकास सेना-शेकाप 3, वंचित बहुजन आघाडी 2 तर शिंदे गट, एमआयएम आणि बसपाने प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

मुंबईत भाजपविरोधात शिवसेनेसोबत

अकोला आणि परभणीत शिवसेनेला काँग्रेसची साथ लागणार आहे. या दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेला पाठिंबा देणार आहोत. एकमेकाला सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. मुंबईत आम्ही एकत्र लढू शकलो नसलो तरी भाजपच्या विरोधात आम्ही एकत्र येऊन मुकाबला करू, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.