हमास आणि लष्कर-ए-तैयबामध्ये हातमिळवणी? जागतिक दहशतवादी संघटनांचे धागेदोरे उघड

LeT-Hamas Alliance: Lashkar Commander Confirms Meeting with Hamas

जागतिक दहशतवादी संघटनांच्या वाढत्या समन्वयाबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेच्या एका वरिष्ठ कमांडरने ‘हमास’ या संघटनेशी असलेले संबंध जाहीरपणे कबूल केले आहेत. यामुळे दक्षिण आशिया आणि मध्यपूर्वेतील दहशतवादी गटांमधील वाढत्या सहकार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग (PMML)—जी लष्कर-ए-तैयबाची राजकीय आघाडी मानली जाते—याचा कमांडर फैसल नदीम याने एका व्हिडीओमध्ये खळबळजनक खुलासा केला आहे. नदीमच्या म्हणण्यानुसार, त्याने २०२४ मध्ये कतारमधील दोहा येथे हमासच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. या दौऱ्यात त्याच्यासोबत सैफुल्ला कसुरी देखील होता, जो जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जाते.

हिंदुस्थानी यंत्रणा सतर्क

या भेटीदरम्यान त्यांनी हमासचा नेता खालिद मशाल याची भेट घेतल्याचे नदीमने मान्य केले. हिंदुस्थानी गुप्तचर संस्थांच्या मते, हा खुलासा लष्कर आणि हमास यांच्यातील थेट समन्वयाचा मोठा पुरावा आहे. हे गट केवळ विचारधारेवरच नव्हे, तर रसद (Logistics), प्रचार आणि प्रशिक्षणाबाबतही एकत्र येत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

पाकिस्तानमध्ये हमास कमांडरची उपस्थिती

काही आठवड्यांपूर्वीच हमासचा कमांडर नाजी झहीर आणि लष्करचा कमांडर रशीद अली संधू यांची पाकिस्तानच्या गुजरांवाला येथे भेट झाल्याचे वृत्त समोर आले होते. नाजी झहीरने ऑक्टोबर २०२३ पासून आतापर्यंत १५ वेळा पाकिस्तानचा दौरा केल्याची माहिती समोर आली आहे.

हमास आणि लष्कर-ए-तैयबा या दोन्ही संघटनांना अमेरिकेने दहशतवादी घोषित केले आहे. या दोन्ही संघटनांमधील वाढती जवळीक पाहता, हिंदुस्थान आता ‘एफएटीएफ’ (FATF) आणि इतर जागतिक व्यासपीठांवर याविरोधात ठोस पुरावे सादर करण्याची शक्यता आहे. या नवीन युतीमुळे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सुरक्षेवर होणाऱ्या परिणामांवर गुप्तचर विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे.

LeT-Hamas Alliance: Lashkar Commander Confirms Meeting with Hamas

A senior Lashkar-e-Taiba commander has admitted to links with Hamas leadership in Doha. Indian intelligence agencies are on high alert over this new terror alliance.