Ajit Pawar plane crash – घड्याळ आणि कपड्यांमुळे अजितदादांची ओळख पटली, अपघाताचे CCTV फुटेजही आलं समोर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर विमान अपघातात निधन झाले. दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

‘व्हीएसआर व्हेंचर्स’च्या मालकीच्या बॉम्बार्डियर लिअरजेट 45 या विमानाने मुंबईहून सकाळी 8.10 च्या सुमारास उड्डाण घेतले होते. हे विमान सकाळी पावणे नऊच्या सुमारास बारामती येथे पोहोचले. पायलटने विमान विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सकाळी दृश्यमानता अचानक कमी झाल्यामुळे विमान धावपट्टीच्या परिसरातच कोसळले. धडकेनंतर विमानाने पेट घेतला आणि मोठे स्फोट होऊन आग लागली. या विमान अपघातात अजित पवारांसह विमानातील सर्वच्या सर्व पाच जणांचा मृत्यू झाला.

विमानाला लागलेली आग आणि भीषण आघातामुळे मृतदेहांची अवस्था अत्यंत विदारक होती. अजित पवार यांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळ आणि कपड्यांवरून पटवण्यात आली. इतर प्रवाशांची ओळखही त्यांच्याकडील वस्तू आणि कपड्यांवरून पटवण्यात आल्याचे वृत्त ‘इंडिया टुडू’ने दिले आहे.

दरम्यान, नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ (फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर) हस्तगत करण्यात आला असून, त्याद्वारे अपघाताच्या शेवटच्या क्षणांतील नेमकी माहिती समोर येईल.

Ajit Pawar Plane Crash – DGCA कडून विमान अपघाताची चौकशी आणि ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम सुरू

गुरुवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार

दरम्यान, अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 11 वाजता अंतस्कार होणार आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकिय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. प्रशासनाने याची तयारी सुरू केली आहे.